सातारा : शेतकऱ्यांना जून अखेर कृषीकर्ज माफी देेण्यात येईल. तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात केली. याशिवाय कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असून केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा प्रति किलो १२.३५ रुपये भावाने खरेदी करणार असल्याचा त्यांनी सांगतिले. पाच लाख प्रधानमंत्री आवास बांधल्यानंतर पुढील टप्प्यात १५ लाख घरे बांधण्याचा व बेघरमुक्त महाराष्ट्र असा संकल्पही फडणवीस यांनी या वेळी जाहीर केला.

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी, ग्रामीण व पंचायत राज मंत्री शिवराजसिंह चौहान, खासदार उदयनराजे भोसले पालकमंत्री शंभूराजे देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, मनोज घोरपडे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

कांद्याचे भाव पडल्यामुळे सध्या राज्यभर कांदा उत्पादक संतप्त झाले आहेत. हा धागा पकडून फडणवीस म्हणाले, की राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र शासनाचे लक्ष वेधले असून केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा १२.३५ रुपये प्रति किलो भावाने खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले.

बेघरमुक्त महाराष्ट्रचा संकल्प असल्याचे जाहीर करत फडणवीस म्हणाले, की केंद्र सरकारने राज्याला तीस लाख घरांच्या योजनेस मंजुरी दिली होती. घरांना ४५ दिवसांत मान्यता, पहिला हप्ता, दुसरा हप्ता अशा पद्धतीने घर बांधणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत पाच लाख घरे बांधून पूर्ण केली. हा देशातील एक विक्रम (रेकॉर्ड) आहे. या पुढील टप्प्यात १५ लाख घरे बांधण्याचा संकल्प आहे. आत्ता पाच लाख घरांमुळे सव्वाकोटी लोक आज स्वतः च्या घरात राहत आहेत. त्यांना सूर्यघरांसह घर दिले आहे असे त्यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांत राज्यात सर्वांना पक्की घरे बांधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांना घरासाठी जागा नव्हती त्यांना जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी जागा खरेदी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून दिले असे सांगून फडणवीस यांनी जगात सर्वत्र इंधनाच्या मोठ्या प्रमाणावर किमती वाढल्या असताना भारत सरकारने केवळ साडेतीन टक्के वाढ केली आहे. प्रत्येक देशभक्त भारतीय पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देतील. राज्यात पन्नास लाख लखपती दीदींचा टप्पा राज्याने पूर्ण केल्याने एक कोटी लखपती दीदी उभ्या करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शिवराजसिंह चौहान म्हणाले, की राष्ट्र पुनर्निर्माणसाठी आम्ही राजकारण करतो. महाराष्ट्र आज केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा पाठपुरावा करतो. एकाच वेळी तीस लाख घरे मंजूर होणारे महाराष्ट्र देशातील एकमेव आणि प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्रात पूर्ण झालेल्या घरांचा सर्व्हे होत आहे. त्यानंतर त्यांना आणखी घरे मंजूर केली जातील. एक जुलैपासून जी रामजी योजना सुरू होत आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहकार मंत्री अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री फडणवीस आणि मी आम्ही चर्चा करून मार्ग काढू. एक कोटी शेतकरी ओळखपत्र तयार करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य ठरले आहे. अनावश्यक खत वापर टाळण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची समयोचित भाषणे झाली. राज्यात बारा महिने बचत गटांच्या उत्पादनांना ग्राहक उपलब्ध करण्यासाठी ‘उमेद मॉल’ उभारणार आहे. सध्या सुरू असणाऱ्या बचतगटांच्या विक्री केंद्रातून मुंबईत ३५ कोटी, वाशी २२ कोटी, नागपूर २९ कोटी रुपयांची विक्री झाल्याचे गोरे यांनी सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.