मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने नांदेड येथे सभेचं आयोजन केलं आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरंतर मला आश्चर्य वाटतं, काँग्रेस पक्षाला अधून-मधून विजय मिळतो. तो त्यांच्या इतका डोक्यात जातो की, आता काँग्रेसचा कुठलाही नेता महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू असं म्हणू लागला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसवाले म्हणतात महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू, परंतु कालपर्यंत त्यांना कर्नाटक म्हटलं की राग यायचा. पण मी त्यांना एकच सांगेन महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालतो. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पॅटर्न. इथे कर्नाटक पॅटर्न चालू शकत नाही. इथे छत्रपती शिवाजी महाराज पॅटर्नच चालणार. तो पॅटर्न या संपूर्ण देशात कोणी आणला असेल तर तो नरेंद्र मोदीजींनी आणला आहे. त्यामुळे इथे फक्त मोदी पॅटर्न चालेल. आपल्याला २०१४ ला देशात विजय मिळाला, २०१९ ला मोठा विजय मिळाला. आता २०२४ च्या विजयाची तयारी आपण सुरू केली आहे.




हे ही वाचा >> राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०२४ ला भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल. आमचं (महाराष्ट्र राज्य सरकार) ठरलं आहे. आमची उत्तर प्रदेश आणि गुजरातशी स्पर्धा आहे की, कोण मोदीजींना सर्वात जास्त जागा देतंय. २०१४ ला महाराष्ट्राने मोदीजींना ४२ जागा दिल्या. २०१९ ला आपण ४१ जागा दिल्या. यावेळी आपण ४२ पेक्षा जास्त जागा देऊ. भाजपा शिवसेना युती यावेळी अधिक जागा जिंकेल. कारण मराठी माणसाचं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे, राष्ट्रवादावर आहे म्हणजेच नरेंद्र मोदींवर आहे.