केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्याचा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांमध्ये निषेध केला असून त्यांनी थेट राज्यातील पोलीस यंत्रणेलाच इशारा दिलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी बाल्कनीमधून ‘महात्मा गांधी की जय’ या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ व्यत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां वैशाली नगवडे यांच्यासह पाच महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली आहे. तर रंगमंदिराच्या परिसरात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमापूर्वी स्मृती इराणी यांचा सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम होता. त्यापूर्वी महागाईच्या मुद्दयावर इराणी यांनी बोलावे, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली  निदर्शने करण्यात आली.

फडणवीस काय म्हणाले?
स्मृती इराणींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी थेट पोलीसांनाच इशारा दिलाय. “रोज कायदा हातात घेतायत आणि बेकायदेशीर कृत्य करतायत. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असं कृत्य करु लागले तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाही हे स्पष्ट या ठिकाणी दिसतंय,” असा टोला फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षांना लगावलाय.

पुढे बोलताना, “अशाप्रकारे स्मृती इराणींवर केलेला हल्ला भ्याड आहे. आम्ही देखील त्याला जशाच तसं उत्तर देऊ शकतो. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही पोलिसांनी संधी देत आहोत. पण पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर आम्हालाही जशाच तसं उत्तर द्यावं लागेल, हे देखील पोलिसांनी चेतवतो,” असंही फडणवीस यांनी संतापून म्हटले आहे.

दरम्यान, स्मृती इराणींच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विशाखा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विशाखा यांच्यासोबत असलेल्या एका मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीसाठी सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis says will revert police in harsh way scsg
First published on: 17-05-2022 at 09:11 IST