भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रव्यापी आघाडी स्थापन केली. या आघाडीला इंडिया आघाडी असे नाव देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार आघाडीमधील पक्ष आणि त्यांचे नेते करत होते. मात्र निवडणूक जवळ येताच आघाडीमध्ये जागावाटपावरून मतमतांतर दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीला ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आणि त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या शकलावर आता भाजपाकडून जोरदार टीका होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपरोधिक टीका करत इंडिया आघाडीला लक्ष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडिया’ आघाडीत उभी फूट? ममता बॅनर्जीनंतर ‘आप’नं पंजाबमध्ये घेतली ‘एकला चलो रे’ची भूमिका

आघाडीत प्रत्येकाचे वेगळे सूर

“इंडिया आघाडी ही मुळात आघाडीच नाही. या आघाडीतील सर्व पक्ष आपापले गाणं गात असून समूहगाण होईल, अशी त्यांची इच्छा आहे. पण समूहगाण गाण्यासाठी कोरसमध्ये गावे लागते, तिथे एकाचवेळी सर्वांनी गाऊन चालत नाही. इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेसची त्या त्या राज्यात थेट स्पर्धा आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला आपला वाटा देणार नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडी चालेल असे मला कधीही वाटले नाही, पुढेही ही आघाडी चालणार नाही”, असे टीकास्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, “पंजाबमध्ये आम्ही काँग्रेसबरोबर युती करणार नाही. राज्यातील १३ जागांवर आम्ही स्वबळावर लढणार असून त्याठिकाणी आम्हाला यश मिळेल.” तसेच पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने फक्त दोन जागा काँग्रेसला देऊ केल्या आहेत. काँग्रेसने १० ते १२ जागांची मागणी केली होती. यावरून लोकसभेचे काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये भारत जोडो न्याय यात्रेने आज प्रवेश केला आहे. त्यामुळेही दोन्ही पक्षात वादाची ठिणगी उडाली आहे.

इंडिया आघाडीच्या ऐक्याला तडा

‘सुभेदारां’च्या भयगंडामुळे ‘इंडिया’च्या जागावाटपात अडथळा

मुंबई मधील मुंबई फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी आले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत इंडिया आघाडीवर टीका केली. मुंबई फेस्टिव्हलबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने यात पुढाकार घेतला. उद्योगपती आनंद महिंद्रा हे मुंबई फेस्टिव्हलचे अध्यक्ष आहेत. मुंबईतील सर्व क्षेत्रातील लोक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहेत. आज स्टार्टअप चॅलेंज आयोजित करण्यात आले होते. पर्यावरणातील बदलांवर परिणाम करणारे दहा शाश्वत असे स्टार्टअप निवडण्यात आले होते. त्यातील तीन स्टार्टअपला आज पोरितोषिक देण्यात आले. जे स्टार्टअप सामान्य माणासच्या जीवनात बदल करणारे असतील तर त्यांच्याशी राज्य सरकारही समन्वय साधून पुढे जाण्याची भूमिका घेईल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis slams india alliance over mamata banerjee will contest elections on her own kvg
First published on: 25-01-2024 at 14:59 IST