Devendra Fadnavis Slams Mallikarjun Kharge Modi Remark: “सततच्या पराभवामुळे मल्लिकार्जुन खरगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा”, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर टीका केली. “खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेले वक्तव्य माघारी घेऊन जाहीर माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केली. मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी संबोधल्याने राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या.
फडणवीसांनी केली माफीची मागणी
सततच्या पराभवामुळे कदाचित मल्लिकार्जुन खरगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा, त्यामुळे राष्ट्रभक्त, देशभक्त आणि ज्यांनी आधुनिक भारत तयार केला त्या मोदींच्या विरोधात अपशब्द वापरले. याच काँग्रेसने मोदींना मौत का सौदागर म्हटले होते. पण, ज्या – ज्यावेळी काँग्रेस मोदींवर टीका करते त्यावेळी जनता त्यांना उत्तर देते, जनात त्यांना पराभूत करते, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. “खरगे यांनी वक्तव्य मागे घेऊन जाहीर माफी मागवी”, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
खरगे काय म्हणाले होते?
मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी असा उल्लेख केला. अण्णा द्रमुक (AIADMK) आणि भाजपाच्या युतीवर टीका करताना त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. चेन्नईत पत्रकार परिषदेत खरगे बोलत होते. “जे लोक अण्णादुराईंचा फोटो लावतात, ते मोदींसोबत कसे जाऊ शकतात? ते (मोदी) एक दहशतवादी आहेत. त्यांचा पक्ष समता आणि न्यायावर विश्वास ठेवत नाही. अशा लोकांसोबत जाणे म्हणजे लोकशाही कमकुवत करणे आहे,” असे खरगे या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
खरगेंचे स्पष्टीकरण
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी याप्रकरणी वाद होऊ लागल्यानंतर स्पष्टीकरण देखील दिले. पंतप्रधानांना ‘दहशतवादी’ म्हणायचे नव्हते, तर ते लोकांना आणि राजकीय पक्षांना “धमकावतात” असे त्यांना म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण खरगे यांनी दिले. तसेच, “मी त्यांना (नरेंद्र मोदी) दहशतवादी म्हटलेले नाही. मोदी नेहमी धमकीचे राजकारण करतात. ईडी, आयकर आणि सीबीआय सारख्या संस्था त्यांच्या हातात आहेत”, असं खरगे म्हणाले.
