Devendra Fadnavis targets opposition over Mahila Arakshan : महिला आरक्षणासाठी संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक आणलं गेलं होतं. मात्र, हे विधेयक मंजूर होण्याकरता एनडीए सरकारकडे दोन तृतीयांश मते जमवता न आल्याने हे विधेयक संसदेत नामंजूर झाले. विरोधकांच्या एकजुटीने हे विधेयक संसदेत पराभूत झाले. त्यामुळे केंद्र सरकावर नामुष्की ओढावली आहे. या विधेयकामुळे विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के मिळणार होते. परंतु, या विधेयकासह असलेल्या इतर विधेयकांमधील त्रुटी दाखवत विरोधकांनी या विधेयकांना नकार दिला. परिणामी राज्यातही यावरून घमासान सुरू झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्र डागायला सुरुवात केली आहे.

विरोधाक सीरिअल लायर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (२० एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली. तर, आज त्यांनी मुंबईत आयोजित केलेल्या युवाशक्ती जागर यात्रेत संबोधित करताना विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “भारताच्या संसदेत महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या विरोधी पक्षांनी केली, त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे. हे विरोधक सीरिअल लायर (अट्टल खोटारडे) आहेत. रोज खोटं बोलतात.”

विरोधकांनी महिलांचा आणि लोकशाहीचा अपमान केला

“२०२३ ला विधेयक आलं, ते पारित झालं. ते विधेयक कधी लागू केलं पाहिजे त्याचं संविधान संशोधन आलं होतं. २०२३ मध्ये विधेयकाला तोंड दाबून पाठिंबा दिला होता. पण त्यांच्या आता लक्षात आलं की एनडीएकडे दोन तृतीयांशी संख्याबळ नाहीय, त्यामुळे त्यांनी खरे दात दाखवले. संपूर्ण भारतातील नारी शक्तीचा आणि लोकशाहीचा अपमान करण्याचं काम विरोधी पक्षांनी केलं आहे. याचा जागर गरजेचा आहे” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तुमच्या मानसिकतेविरुद्ध संघर्ष सुरूच राहणार

ते पुढे म्हणाले, विरोधक रोज खोटं बोलतात. सीमांकन, जनगणनेबद्दल खोटं बोललं जातंय. या विधेयकाबाबतची वस्तुस्थिती आणि संविधानाने टाकलेली जबाबदारी काय आहे हे सभागृहात अमित शाहांनी स्पष्ट केलं होतं. विरोधकांनी काही सुधारणा सांगितल्या होत्या, त्या सुधारणाही एक तासात करण्याचा शब्द दिला होता. पण त्यांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाहीय. लोकसभेत महिला आरक्षण येऊ नये असा त्यांचा प्रयत्न आहे. या भारतात ज्या लोकांनी महिलांना सहभागिता देण्याबद्दल कार्य केलंय, त्या सर्वांना स्मरून सांगतो की तुमच्या या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू झाला आहे. जोपर्यंत भारताच्या संसदेत आणि विधानसभा महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला झोपू देणार नाही. तुमच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहिल”, असा इशाराच त्यांनी दिला.

तसंच यावेळी एका हिंदीच्या म्हणीतूनही त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, “मी विश्वासाने सांगतो की, तुम्ही खोटं बोललात तरी झूट की उमर कभी बडी नही होती और सच का कभी समाप्त नहीं होता. त्यामुळे सत्य कधी संपणार नाही हे सांगू इच्छितो.”

अंजली दमानिया यांनीही केली होती टीका

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. “फडणवीसांचा खरेपणा संपत चालला आहे. पूर्वी ते तसे नव्हते, पण आता ते फक्त राजकारण करतात. महिला आरक्षण विधेयकाचा आणि डिलिमिटेशन काहीच संबंध नाही हे पूर्ण माहीत असताना फक्त खोटं बोलण्याचा भाजपचा अजेंडा अगदी रेटून नेण्याचे काम फडणवीस करत आहेत. आता खोट बोलण्याचं GOLD MEDAL तुम्हाला देण्याची वेळ आली आहे”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.