scorecardresearch

“हे काय भगत सिंगांपेक्षा…” राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले, “समोरच्यांनी…”

विधानसभेच्या अधिवेशनावेळी सत्ताधारी भाजपा नेत्यांनी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

Devendra Fadnavis
विधीमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतच्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. या वक्तव्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. सत्ताधारी पक्षांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसेच विधीमंडळाच्या आवारात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. या घटनेचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान निषेध नोंदवला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, “विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जी भूमिका मांडली आहे ती योग्यच आहे. विधीमंडळाच्या परिसरात जोडे मारो वगैरे आंदोलन कोणी करू नये. या बाबतीत मी पवार यांच्याशी सहमत आहे. अशा प्रकारचं आंदोलन करण्यापूर्वी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्याचवेळी देशाचे सुपूत्र आणि क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे बोललं जातंय ते बोलणं बंद केलं पाहिजे.”

फडणवीस म्हणाले की, “सावरकरांनी देशासाठी जे भोगलं ते दुसऱ्या कोणी भोगलं नाही. आंदमानच्या कारागृहात त्यांनी अनन्वित अत्याचार सहन केले. ११ वर्ष त्रास सहन केला. अत्याचार होत असताना इतर सहकारी मृत्यूमुखी पडले, अनेकजण अक्षरशः वेडे झाले. पण सावरकर मात्र भारत माता की जय असा जयघोष करत राहिले, वंदे मातरम् म्हणत राहिले. स्वतः भगत सिंग यांनीदेखील सावरकरांनी छापलेलं आत्मचरीत्र तयार करून वाटायचं काम केलं होतं. ही गोष्ट इतिहासात नमूद आहे. हे (सावरकरांचा अपमान करणारे) कोण आलेत? हे काय भगत सिंगांपेक्षा मोठे आहेत का?”

हे ही वाचा >> संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवलं, ‘या’ नेत्याचा दिल्लीत आवाज घुमणार

“ही हीन प्रवृत्ती आहे”

उपमुख्यमंत्री म्हणाले की, “सावरकरांबद्दलच्या त्या वक्तव्याचा निषेध झलाच पाहिजे. तसेच सभागृहाच्या आवारात कुठल्याही नेत्याला जोडे मारोसारखं आंदोलन करणं योग्य नाही. सभागृहाचा आवार अशा गोष्टींसाठी नाही. परंतु समोरच्यांनी (काँग्रेस) लक्षात ठेवावं, असं काहीही बोलणं चुकीचं आहे. ही हीन प्रवृत्ती आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 16:14 IST

संबंधित बातम्या