Devendra Fadnavis targets Rahul Gandhi: महिला आरक्षण विधेयक व मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर यंदाचं संसदेचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरलं. विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडताना सरकारच्या धोरणांना कठोर विरोध केला. त्याच मुद्द्यावर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व विरोधी पक्षांकडून सातत्याने भूमिका मांडली जात असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस पक्ष व यूपीएतील इतर विरोधी पक्षांना महिला आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केलं.

..आणि सोनिया गांधींनी थयथयाट सुरू केला – देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राहुल गांधींची व काँग्रेसची महिला सबलीकरणाची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. “आज खऱ्या अर्थानं मातृसत्तेचं सर्वात मोठं प्रतीक कुठलं असेल तर ते वंदे मातरम् गीत आहे. पण ते सुरू झाल्याबरोबर सोनियाजींनी थयथयाट चालू केला. वंदे मातरम् गीत थांबवायला लावलं. हे तेच वंदे मातरम् गीत आहे, जे गात गात अनेक स्वातंत्र्यसेनानी फाशीवर गेले. गळ्यात फास होता तरी घाबरले नाहीत. वंदे मातरम् म्हणत राहिले. पण या देशाला पितृसत्ताक म्हणणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणतो तेव्हा काटे टोचतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींना हाच प्रश्न आहे की जेव्हा महिलांना संधी देण्याची वेळ होती, तेव्हा प्रियांका गांधींना संधी का दिली गेली नाही? हे राहुल गांधी व त्यांच्या मातोश्रींनाही सांगावं लागेल”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी प्रियांका गांधींचाही उल्लेख केला.

“काँग्रेसच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही”

दरम्यान, देशात ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तिथे एकही महिला मंत्रिमंडळात का नाही? असा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केला. “एकीकडे महिलांबद्दल बोलायचं आणि दुसरीकडे जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं राजीव गांधींच्या काळात मुस्लीम महिलांना पोटगीचा अधिकार आहे, त्यांना असा तलाख देता येणार नाही असा निर्णय दिला, तेव्हा संसदेत कायदा आणून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलायचं काम याच काँग्रेसनं केलं होतं. तेव्हा महिला कुठे होत्या? जर हिमाचल, कर्नाटकच्या मंत्रिमंडळात घेण्यासाठी एकही महिला मिळत नाही आणि इथे येऊन महिलांच्या संदर्भात विधानं करत असतात”, असं ते म्हणाले.

“आज महिला आरक्षणाचा खरा हत्यारा कुणी असेल, तर तो राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतचे यूपीएमधले पक्ष आहेत”, असंही ते म्हणाले.

महिला आरक्षण विधेयक व काँग्रेसची भूमिका

दरम्यान, संसदेत महिला आरक्षण विधेयक व मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यांवरून काँग्रेसने मांडलेल्या भूमिकेवरही देवेंद्र फडणवीसांनी तोंडसुख घेतलं. “पंतप्रधान मोदींनी महिलांना लोकसभेत-विधानसभेत आरक्षण देण्यासाठी कायदा केला. हा कायदा लागू करायचा आहे. विरोधकांना माझा प्रश्न आहे. २०२३ साली जेव्हा हे विधेयक आलं, तेव्हा त्यात दोनच गोष्टी होत्या. पहिली म्हणजे महिलांना ३३ टक्के आरक्षण. ते देण्यासाठी दोन अटी होत्या. पहिली म्हणजे जनगणनेची आकडेवारी घ्यायची आणि दुसरी अट म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना त्या आकडेवारीच्या आधारावर करायची. माझा राहुल गांधींना, सुप्रिया सुळेंना, सकाळच्या भोंग्याला सवाल आहे. मला सांगा, २०२३ ला तुम्ही ज्या कायद्याला मतदान केलं होतं, त्यात मतदारसंघ पुनर्रचनेचा उल्लेख होता की नाही. तो होता. तुम्ही कायद्याला मतदान केलं. तुम्ही एकमताने ठरवलं की महिला आरक्षण द्यायचं असेल तर मतदारसंघ पुनर्रचना करायची आणि त्यानंतर महिलांना आरक्षण द्यायचं. तेव्हा तुम्ही त्याला मतदान केलं. कारण तुम्हाला माहिती होतं एनडीएजवळ दोन तृतीयांश बहुमत होतं. त्यांनी मतदान केलं नसतं तरी ते विधेयक पारित झालं असतं. म्हणून बेहेती गंगा मे हाथ धोने के लिये तुम्ही विधेयकाला मतदान केलं”, असं ते म्हणाले.