मुंबई: माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही पंतप्रधानांची तुलना करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना होऊच शकत नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पवारांना खडे बोल सुनावले. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात पवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांची पंडित नेहरू यांच्याशी तुलना होऊ शकत नाही असे स्पष्ट वक्तव्य केले होते.
पवार यांच्या या भूमिकेबद्दल बोलताना फडणवीस यांनी पवारांचे नाव न घेता त्यांना खडे बोल सुनावले. माझी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना कोणी केलेली नाही.दोन्ही नेते मोठे. मात्र सलग १२ वर्ष देशाचे पंतप्रधानपद भूषविताना मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम मोडीत काढला आहे, हे नाकारता येणार नाही.
मोदी यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला असे बोलण्यात वावगे काय आहे, असा टोला फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला. राज्यात वसंतराव नाईक सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर विराजमान राहिले होते. आपणही २०१४ ते १९दरम्यान सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिलो. त्यामुळे वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले मुख्यमंत्री म्हणून आपली कोणी तुलना केली तर त्यात गैर काय असेही फडणवीस यांनी सुनावले. पंतप्रधान नेहरू आपल्या ठिकाणी मोठे असून मोदीजीही आपल्या ठिकाणी मोठे आहेत. मात्र भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी या देशातील जनतेने जी स्वप्न पाहिली होती ती गेल्या साठ वर्षात पूर्ण होऊ शकली नाहीत. मोदीजींनी मात्र केवळ बारा वर्षात लोकांची स्वप्न पूर्ण केली आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले म्हणून कोणाला वाईट वाटायचे कारण नाही. असा टोलाही त्यांनी पवार यांना लगावला.
नाशिकच्या गोकुळात शांतता
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेल्याराजकारणाबाबत बोलताना आता नाशिकच्या गोकुळात शांतता नांदत असून गीत गायनही संपल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जळगाव आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाचे नेते माहितीचे उमेदवार निवडून आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तर अमरावती मधील काँग्रेस उमेदवाराने रुग्णालयात दाखल होऊन ऑनलाइनच्या माध्यमातून निवडणूक प्रचार चालवल्याबद्दल बोलताना संबंधित उमेदवाराने मतदारांशी संवाद साधण्यापेक्षा काँग्रेस नेत्यांशी संवाद साधावा असा टोला फडणवीस यांनी लगावला.
