केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे भारतीय जनता पार्टी देशभर वेगवेगळे कार्यक्रम, सभा आणि रॅली काढून सरकारने ९ वर्षात काय काय कामं केली ती लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याचदरम्यान भारतीय जनता पार्टीने आज (१० जून) नांदेड येथे सभेचं आयोजन केलं आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातले भाजपाचे अनेक मोठे नेते उपस्थित होते.
या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका जवळ आल्या की पवार साहेबांचे स्टेटमेंट सुरू होतात. कोणीही इंटरनेटवर जाऊन तपासा किंवा जुने पेपर (वर्तमानपत्र) तपासा. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी पवारसाहेब जे बोलले होते, तेच २०१९ च्या निवडणुकीआधीच्या प्रचारावेळी बोलले होते. तीच वाक्यं विधानसभा निवडणुकीच्या आधी बोलले. निवडणुका आल्या की ते सांगतात देशात मोदींची लाट नाही.




देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका जवळ आल्या पवारसाहेब म्हणतात मोदींची लाट आता राहिली नाही. ती लाट आता खाली चालली आहे. सगळे विरोधात गेले आहेत. सगळीकडे आम्हीच निवडून येणार आहोत. प्रत्येक वेळी असं सांगतात आणि ते पुन्हा उघडे पडतात, कारण पुन्हा एकदा मोदीजीच निवडून येतात.
हे ही वाचा >> “ते एकनाथ शिंदेंचं कारस्थान…”, आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत ठाकरे गटाच्या माजी खासदाराचा मोठा आरोप, म्हणाले…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ ला पवार साहेबांनी सांगितलं होतं की, देशात विरोधकांची हवा आहे. मोदीजींची हवा संपली. त्यावेळी सगळे विरोधक हातात हात घालून उभे राहिले होते. पारंतु जेवढे विरोधेक एकत्र केले होते तेवढ्यासुद्धा जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देशात निवडून आणल्या नाहीत. जेवढे नेते त्यांच्या मंचावर होते तेवढ्याही जागा आल्या नाहीत. आता पवार साहेब म्हणतात देशातली हवा बदलत आहे. परंतु हा देश कालही मोदीजींच्या मागे होता, आजही मोदीजींच्या मागे आहे आणि उद्याही असेल.