scorecardresearch

“सरकारमध्ये जाणार नसल्याची घोषणा करून घरी गेलो आणि…”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या शेवटच्या क्षणी घडलेल्या घडामोडी!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “छत्रपती शिवराय आपले आराध्य दैवत आहेत. छत्रपतींनी जो गनिमी कावा आपल्याला सांगितला, त्याच गनिमी काव्यानं…!”

Devendra Fadnavis reaction about Aarey Metro car shed
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं असून आता नेमकं काय आणि कसं घडलं? यावर राजकीय विश्लेषक खल करू लागले आहेत. विशेषत: १०६ आमदारांचा पाठिंबा असूनही देवेंद्र फडणवीसांनी ४० आमदारांसोबत आलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ केलं आणि स्वत: उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्रीमंडळात जाणार नसल्याचं सांगूनही अर्ध्या तासात फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद कसं स्वीकारलं? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच त्याविषयी खुलासा केला आहे.

राज्यातील सत्तानाट्याच्या महाअंकावर पडदा पडल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच, विमानतळावरून त्यांची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीदरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून दिली. तसेच, शिवरायांच्या गनिमी काव्यानं सरकार परत मिळवल्याचं देखील ते म्हणाले.

“अडीच वर्षापूर्वी २०१९ला महाराष्ट्रात तुम्ही भाजपा-शिवसेनेचं सरकार आणलं. पण आपल्याशी बेइमानी झाली. आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आपलं बहुमत पळवलं गेलं. जनतेचा कौल चोरी गेला. पण तो चोरी गेलेला कौल अडीच वर्षाची लढाई लढून आम्ही परत मिळवलाय. तुमच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपा युतीचं

सरकार नव्याने महाराष्ट्रात आपण आणलं आहे. एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत. नागपूरचं एकनाथ शिंदेंचं स्वागत ठाणे-मुंबईलाही ऐकू गेलं पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

“गनिमी काव्यानं महाराष्ट्रात पुन्हा सरकार आलं”

“गेली अडीच वर्ष ही अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची गेली. राज्यात प्रशासन नावाची गोष्ट नव्हती. अनेक राजे काम करत होते. कोण राज्य चालवतंय ते समजत नव्हतं. सामान्य माणसाचं कुणी ऐकायला तयार नव्हतं. आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत. ते आपले आराध्य दैवत आहेत. छत्रपतींनी जो गनिमी कावा आपल्याला सांगितला, त्याच गनिमी काव्यानं आणि छत्रपतींसारखं निधड्या छातीनं महाराष्ट्रात हे सरकार पुन्हा एकदा आलं”, असं फडणवीसांनी यावेळी नमूद केलं.

“मी म्हटलं होतं की हे सरकार बनवेन, पण मी सरकारमध्ये जाणार नाही. तशी घोषणाही केली होती. पण घोषणा करून घरी गेलो आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी जाहीर करून टाकलं की फडणवीसांनी सरकारमध्ये जावं. नड्डा, अमित शाह माझ्याशी बोलले. शेवटी मोदींशी संवाद केल्यानंतर पक्षात आदेश हाच महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन एकच निर्णय घेतला. नागपुरातला देवेंद्र फडणवीस जर भाजपा आणि मोदी नसते, तर कधीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता. त्यामुळे जे नेते आणि पक्ष मला सर्वोच्च पदावर बसवतात, त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायलाही तयार आहे. त्यांनी तर माझा सन्मान करून मला सरकारमध्ये जाण्यास सांगितलं. म्हणून मी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

नागपुरात फडणवीसांचं जंगी स्वागत, पाहा व्हिडीओ

“४० वर्षांनंतर टर्म पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता”

“काही लोक म्हणतात, हे सरकार ६ महिने चालेल. २०१४चं सरकार आल्यानंतर तेव्हाही हेच म्हणायचे की वर्षभराच्या वर सरकार चालणार नाही. पण ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ५ वर्ष पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता. २०२४मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis slams shivsena in nagpur rally praised eknath shinde pmw

ताज्या बातम्या