Devendra Fadnavis Defends Bhushan Gavai: गेल्या दोन दिवसांपासून माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्य प्रदेशातील धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. देशाच्या सरन्यायाधीशपदी राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडणं चुकीचं असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावर अंधश्रद्धा निर्मूल समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषण गवईंच्या समर्थनार्थ उतरले असून त्यांनी श्याम मानव हे फक्त प्रसिद्धीसाठी अशी विधानं करत आहेत, अशी टीका केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्याम मानव यांच्या विधानाबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिलं. भूषण गवईंनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये, असं श्याम मावन म्हणाले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, “श्याम मानव कोण आहेत हे सांगणारे? त्यांना कुणी हा अधिकार दिला? ते थोडीच सर्टिफिकेट वाटणार आहेत? श्याम मानव अलिकडच्या काळात फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. त्यांना कुणी विचारत नाहीत, त्यामुळे प्रसिद्धी मिळावी म्हणून ते रोज अशी विधानं करतात”. दरम्यान, आधी बागेश्वर शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान वादात सापडलं असताना आता भूषण गवईंच्या भेटीवरूनही वाद निर्माण झाला आहे.
भूषण गवई व बागेश्वर शास्त्री यांची भेट
भारताच्या सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झालेले भूषण गवई यांनी नुकतीच बागेश्वरचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्या घेतलेल्या भेटीपासून या वादाला सुरुवात झाली. माजी सरन्यायाधीशांनी बागेश्वर शास्त्रींची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावरच श्याम मानव यांनी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात परखड शब्दांत टीका केली.
“सरन्यायाधीशासारखे सर्वोच्च पद भूषवूनही भूषण गवई धीरेंद्र शास्त्रींपुढे नतमस्तक होत असतील, तर आता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगू नये. त्यांच्या या भेटीचा मला प्रचंड धक्का बसला आहे. भूषण गवई सांगतात की ते आंबेजकरी विचारांचे आहेत. पण जर ते धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील, तर त्यांनी आंबेडकरांचे नाव कधीही घेऊ नये. तो अधिकार त्यांनी गमावला आहे”, असं श्याम मानव म्हणाले. तसेच, धीरेंद्र शास्त्रींना खरंच दिव्य दृष्टी असेल, तर त्यांनी अंनिसचं आव्हान स्वीकारावं, त्यांना ८० लाखांचं पारितोषिक देऊ, या आपल्या आव्हानाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
धीरेंद्र शास्त्री शिवाजी महाराजांबाबत काय म्हणाले होते?
बागश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या विधानावरून सध्या वाद चालू आहे. “एकदा युद्ध करून थकलेले शिवाजी महाराज रामदास स्वामींकडे गेले आणि म्हणाले आता मला विश्रांती घ्यायची आहे, राज्याचा कारभार तुम्ही सांभाळा म्हणत डोक्यावरचा जिरेटोप रामदास स्वामींना दिला. त्यावर रामदास स्वामी म्हणाले मी गुरू आणि तुम्ही माझे शिष्य आहात. शिष्याचं कर्तव्य म्हणजे गुरुच्या आज्ञेचं पालन करणं. त्यामुळे मी राज्यकारभार स्वत:कडे घेऊन तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही माझ्या वतीने तो सांभाळावा”, असा प्रसंग बागेश्वर शास्त्रींनी सांगितला. त्यावरून राजकीय, सामाजिक वर्तुळातून दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत.
