केंद्रीय निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (४ ऑक्टोबर) मुंबईत ‘गर्जना मोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र सहभागी झाले होते.

या मोर्चात बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धोरणांवर आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या मोर्चावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

‘आजचा मोर्चा म्हणजे हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न होता’, अशी टीका करत ‘हे गजनी झालेत’, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

“आज मुंबईत जो मोर्चा निघाला, तो मोर्चा म्हणजे आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न होता. त्या मोर्चाला एवढे लोकही नव्हते. मात्र, सर्वात महत्वाचं काय आहे तर ते सातत्याने म्हणतात की महाराष्ट्राच्या निवडणुकीत काहीतरी गडबड झाली, त्यामुळे ज्ञानेश कुमारांना हटवा. एसआयआरमुळे ज्ञानेश कुमारांना हटवा. मी आता त्यांना (राज आणि उद्धव ठाकरे यांना) आठवण करून देतो, कारण हे गजनी झाले आहेत. त्यामुळे या गजनींना मी आठवण करून देऊ इच्छितो की, ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त २०२५ मध्ये झाले. महाराष्ट्राची निवडणूक २०२४ मध्ये झाली, एसआयआरची प्रक्रिया आता २०२६ मध्ये होत आहे. मग २०२५ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झाले असतील तर ते २०२४ च्या निवडणुकीवर कसा परिणाम टाकू शकतील? त्यामुळे खोटं बोलत असलो, तरी किमान ते सत्य वाटलं पाहिजे असं तरी बोललं पाहिजे. मात्र, हे धडधडीत खोटं बोलत आहेत. लोकांनी नाकारल्यानंतर ते आपलं फ्रस्ट्रेशन निवडणूक आयोगावर काढत आहेत”, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली.

शिक्षक-पदवीधर निवडणुकीबाबत फडणवीस काय म्हणाले?

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या घडामोडींवर मुख्यमंत्रीफडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्वाचं भाष्य केलं. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, काही ठिकाणी महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला.

यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “विधानपरिषदेसाठी भाजपाने तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले आहेत. आम्हाला विश्वास आहे की या तिन्ही जागा आम्ही जिंकू. तसेच उर्वरित ठिकाणी आमचे मित्रपक्ष लढतील आणि ते देखील तेथून जिंकतील असा आम्हाला विश्वास आहे. तसेच पक्षाने ज्याला उमेदवारी दिली, त्याने निवडणूक लढली पाहिजे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी माघार घेतली पाहिजे. मात्र, तर कोणी बंडखोरी करणार असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करू”, असं फडणवीसांनी म्हटलं.