गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून सुरू असून दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक झाली असून पुढील कारवाई सुरू आहे.

श्रीराम मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये कथित अपहाराच्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. या कथित अपहाराच्या प्रकरणाचा निषेध करण्याच्या अनुषंगाने आज मुंबईतील दादर या ठिकाणी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने ‘रामरक्षा आंदोलना’ची घोषणा करण्यात आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामाचा मार्ग सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली’, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मला आनंद आहे की शेवटी उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाची आठवण झाली आहे. आमची अपेक्षा एवढीच होती की उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाची आठवण झाली पाहिजे. कारण त्यांनी प्रभू श्रीरामाचा मार्ग सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. मात्र, जर ते (उद्धव ठाकरे) राममार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल. फक्त आजच्या दिवसांपुरती नाही, तर त्यांनी दररोज रामरक्षा म्हणावी अशी माझी अपेक्षा आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

श्रीराम मंदिर देणग्या कथित अपहार प्रकरण काय आहे?

राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीच्या हाताळणीत आणि देखरेखीत मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा झाल्याचं ‘एसआयटी’च्या प्राथमिक चौकशीत उघड झालं. हा अहवाल समोर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. दरम्यान, क्राईम ब्रँच आणि विशेष तपास पथकाने गुरुवारी या प्रकरणात ८ जणांना अटक करत मोठी कारवाई केली. या अटकेच्या अवघ्या २४ तासांच्या आत ट्रस्टच्या दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.