शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यभर सभा घेत आहेत. त्यांच्या पक्षाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गमावलं आहे. पक्षाच्या या पडझडीच्या काळात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, निष्ठावंतांना एकसंघ ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ते विभागवार जाहीर सभा घेणार आहेत. अलिकडेच त्यांनी कोकणात खेड येथे मोठी सभा घेतली. त्यानंतर आता त्यांची दुसरी जाहीर सभा आज (२६ मार्च) नाशिकच्या मालेगावात होणार आहे. शिवसेनेने मालेगावात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी केली आहे. मालेगावात ठिकठिकाणी सभेचे बॅनर लागले आहेत. मालेगाव हा मुस्लीमबहूल भाग आहे. त्यामुळे काही ठिकाणी लागलेले बॅनर हे उर्दू भाषेत आहेत. यावरून आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका सुरू आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने या बॅनरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मालेगावातील सभेच्या उर्दू बॅनरवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? हे त्यांना विचारा. उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेत कोणी काही म्हटलं तर आम्हाला काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर उद्धव ठाकरे लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल." "उर्दूवर बंदी आहे का?" संजय राऊतांचा सवाल संजय राऊत याबाबत म्हणाले की, "एखाद्या भाषेवर या देशात बंदी आहे का? उर्दू ही या देशातली भाषा नाही का? जावेद अख्तर यांनी देशाच्या बाहेर जाऊन देशाची भूमिका मांडण्याचं काम या भाषेत केलं आहे. सत्ताधारी केवळ लोकांचं लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मालेगावच्या सभेनं लोकांची हातभर फाटली आहे" हे ही वाचा >> “पवारांची चावी कुठेही चालते”; गुलाबराव पाटलांचा टोला, म्हणाले, “त्यांनी उठोबा-बठोबा..” काय लिहिलंय बॅनरवर? या बॅनरवर उर्दू भाषेत लिहिलं आहे की, "अब हमे जितने तक लढना हैं : अली जनाब उद्धव साहब ठाकरे"