मुंबई : विविध देशांमधील संबंध केवळ व्यापार आणि आर्थिक सहकार्यापुरते मर्यादित न ठेवता मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवादाला प्राधान्य देण्याची गरज आहे. विविध देशांच्या संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढविल्यास अधिक समतोल, शांततामय आणि समृद्ध जगाची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’च्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. भारतासह ब्रिक्स देशांतील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्राझीलचे मुंबईतील महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनेस्का कोस्टा कौटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन ती आणि दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांची उपस्थिती होती.
जागतिक व्यवस्था विविध पातळ्यांवर असंतुलित होत असताना विविध देशांना एकत्र आणणाऱ्या संधींचा शोध घेणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. संस्कृती, विचार आणि विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी संवादातून समान मूल्यांवर आधारित परस्पर समज निर्माण करता येते. केवळ आर्थिक संबंध आणि व्यापाराच्या माध्यमातून जग अधिक चांगले होऊ शकत नाही. त्यासाठी मानवी मूल्यांवर आधारित संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या संस्कृतीचा मूलभूत आधार ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा असून संपूर्ण विश्व एक कुटुंब असल्याची जीवनदृष्टी भारताने जगाला दिली आहे. भारताने इतिहासात केवळ वस्तू आणि व्यापाराचा प्रसार केला नाही, तर विचार, ज्ञान आणि जीवनमूल्येही जगभर पोहोचविली. भारतातून विविध देशांत पोहोचलेल्या बौद्ध विचारधारेचे उदाहरण देताना तिचा प्रसार युद्ध किंवा हिंसेतून नव्हे, तर विचार आणि मूल्यांच्या प्रभावातून झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ब्रिक्स राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक समानता आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून नव्या भागीदारीच्या संधी निर्माण करण्यासाठी ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’ महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास संचालिका जान्हवी पवार यांनी व्यक्त केला. भारत-ब्राझीलच्या सांस्कृतिक साम्यस्थळांचे दर्शन घडविणारे दृकश्राव्य सादरीकरणही यावेळी करण्यात आले. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा देताना फडणवीस यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख यावेळी केला.
