scorecardresearch

“सावरकरांना ‘भारतरत्न’ नाही दिला तरी चालेल, पण…”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर विधान परिषदेत गदारोळ, नेमकं काय घडलं?

देवेंद्र फडणवीसांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाबद्दल प्रश्न उपस्थित करताच विधान परिषदेत गदारोळ निर्माण झाला.

“सावरकरांना ‘भारतरत्न’ नाही दिला तरी चालेल, पण…”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर विधान परिषदेत गदारोळ, नेमकं काय घडलं?
फोटो- विधान परिषद

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. भाजपासह शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी विविध महापुरुषांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. याच मुद्द्यावरून आज विधान परिषदेत मोठा गदारोळ निर्माण झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाबद्दल प्रश्न उपस्थित करताच विधान परिषदेत गदारोळ निर्माण झाला. आरडाओरड झाल्यानंतर विधान परिषदेच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचं आजचं कामकाज तहकूब केलं.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला. यावरून त्यांनी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही याच मुद्यावर निवेदन सादर केलं. दरम्यान, त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा पाढा वाचला. तसेच परब यांनी आपल्या निवेदनात सावरकरांच्या अपमानाबद्दल कोणताही उल्लेख का केला नाही, असा सवाल फडणवीसांनी विचारला.

हेही वाचा- “पंडित नेहरूंच्या चुकीमुळे…”, सुधीर मुनगंटीवार यांचं विधान चर्चेत; सीमाप्रश्नावरील ठरावाचा केला उल्लेख!

विधान परिषदेत केलेल्या भाषणात फडणवीस म्हणाले की, “परबसाहेब तुमच्याकडून अपेक्षा होती. पण तुम्ही आपल्या भाषणात एकदाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण दिलं नाही. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात आणि स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. त्याबाबत कुणी बोलत नाही. माझं म्हणणं आहे की, सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल पण किमान त्यांचा अपमान तरी थांबवा,” असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- Maharashtra Winter Session: “…तर मीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन”, फडणवीसांसमोरच अजित पवारांचा भाजपा नेत्याला इशारा

काँग्रेस आमदार वीरेंद्र जगताप यांच्या विधानाचा उल्लेख करत फडणवीस पुढे म्हणाले, “सावरकर हा गलिच्छ, नीच राजकारण करणारा आहे, त्याला स्वातंत्र्यवीर कसे म्हणायचे… सावरकर देशाचा कलंक होता, असं विधान वीरेंद्र जगताप यांनी केलं. तसेच तुमच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणतात, राम आणि श्रीकृष्णा थोतांड आहे. सात महिने आगोदर सीता मातेला जो सोडून जातो आणि स्वत: शबरीसोबत बोरं खात बसतो. असा देवांचा अवमान करणाऱ्या तुमच्या नेत्या… कृष्ण बायकांना आंघोळ करताना पाहतो. कृष्णा पुन्हा अवतरत का नाही? तो कुठल्यातरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा… असं आमच्या कृष्णाबद्दल तुमच्या नेत्या बोलतात, यावर तुम्ही काहीही बोलत नाही, मूग गिळून गप्प बसले आहात,” असा संतप्त सवाल फडणवीसांनी विधान परिषदेत विचारला. यानंतर गदारोळ निर्माण झाल्याने विधान परिषदेतील कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 18:49 IST

संबंधित बातम्या