मुंबई भारतीय जनता पक्षाचं आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत महायुतीला तुमच्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली. महाराष्ट्रात दोन लाख मतं कमी मिळाली पण मुंबईकरांनी महायुतीला २६ लाख मतं दिली आणि महाविकास आघाडीला २४ लाख मतं दिली. दोन लाख मतं जास्त मिळाली. निवडणुकांमध्ये अर्थमॅटिक वेगळं होतं त्यामुळे आपल्या दोन आणि त्यांच्या चार जागा आल्या असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज भाजपा विजय संकल्प मेळावा पार पडला त्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मुंबईत लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या चार जागा कुठून आल्या हे नीट पाहिलं तर लक्षात येईल की सामान्य मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही. मुंबईत असलेल्या, चार पिढ्या मुंबईकर असलेल्या उत्तर भारतीयांनी मतदान केलेलं नाही. त्यांना नेमकं कुठून मतदान मिळालं तर लक्षात येईल की मागचे चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो म्हणलं सोडलं होतं. तसंच ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणं सोडून जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं. केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी अर्थमॅटिक जिंकलं आहे. मात्र हे सगळं विधानसभेत आणि महापालिकेत चालणार नाही. मी हे सांगू इच्छितो की मुंबईकरांचा विश्वास हा नरेंद्र मोदींवर आहे. भरभरुन मतं आपल्याला मिळाली आहेत. वरळीसारख्या मतदारसंघात फक्त सहा हजारांचा लीड मिळाला. तिथे आदित्य ठाकरे आमदार आहेत आणि त्यांना आमदार करण्यासाठी दोन आणखी आमदारांनी ज्या वरळीत तयार केले तिथे अवघा ६ हजार मतांचा लीड मिळाला. टेम्प्रेचर कुठे आहे ते लक्षात येतं आहे.”

महाराष्ट्रात पॉलिटिकल अर्थमॅटिक आपल्या विरोधात गेलं

“महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे. पण मतांमध्ये कुठेही कमतरता पडली नाही. आपल्या ४३.६ टक्के त्यांना ४३.९ टक्के आहे. .३० इतकाच फरक आहे. त्यामुळे त्यांना विजय मिळाल्याचा आभास तयार करता आला. भाजपाच्या १३ जागा अशा आहेत ज्या चार टक्केंपेक्षा कमी मतांनी आपण हरलो आहोत. जे जिंकले त्यांना शुभेच्छा आहे. आता आपल्याला जे मिळालंय ते पुढे घेऊन जाऊ. ज्या पक्षाला एकेकाळी दोन खासदारांवरुन हिणवलं होतं त्या पक्षाच्या नेत्यांनी रेकॉर्ड केला आणि पंडीत नेहरुंच्या नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी आहेत. कधी कधी मेरिटमध्ये पास होणारा मुलगा डिस्टिंक्शनमध्ये ७५ टक्के मिळाले तरीही लोकांना वाटतं मेरिटचा मुलगा होता. तर जो ३५ टक्के मार्क मिळवतो त्याला ४० टक्के मिळाले तर लोक त्याची हत्तीवरुन वरात काढत आहेत. संपूर्ण इंडिया आघाडी मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून जास्त जागा भाजपाला मिळाल्या. आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी इंडिया आघाडीशी हरलो नाही, फेक नरेटिव्हमुळे कमी पडलो आहे. देशातल्या ७६ जागा अशा आहेत जिथे कमी फरकाने आपण पडलो. संविधान बदलणार या खोट्या प्रचारामुळे या गोष्टी घडल्या.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य, “भाजपात एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही, विनोद तावडे…”

विधानसभेवर आणि मुंबई महापालिकेवर आपला भगवा फडकणार

“फेक नरेटिव्ह फॅक्टरीला सोशल मीडियावर आपण तेवढ्या ताकदीने उत्तर देऊ शकलो नाही किंवा डॅमेज इतकं होतं आहे हे लक्षात आलं नाही. त्यामुळे कमी फरकाने आपण देशात ७६ सीट हरलो. काही लोक डमरु वाजवत आहेत, काही लोक छाती बडवत आहेत, त्या सगळ्यांना मी सांगतो फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो वारंवार चालत नाही. आम्ही पुन्हा येऊ. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आपण डाऊन झालो आहोत पण आऊट नाही हे लक्षात घ्या. पूर्ण ताकदीने विधानसभा जिंकणार आहोत. विधानसभेत आपण जास्त जागा जिंकू आणि महापालिका निवडणूक कधीही येऊद्या कधीही महानगरपालिकेवर आपला भगवा फडकणारच. असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे घेणार मुंबईत झाडाझडती; पराभूत उमेदवारांना निमंत्रण

“फेक नरेटिव्ह असताना आम्ही आमचा गड राखू शकतो हे मुंबई भाजपाने दाखवून दिलं आहे. भाजपाचं काम खालपर्यंत रुळलं आहे हा माझा विश्वास आहे. हे सगळं घडताना एक नक्की सांगेन. निवडणुकीत स्पर्धा असणं, आपण जिंकणार आहोत तर कमी काम केलं तरी चालतं, काही चमकेश नेते तयार होणं या गोष्टी जिंकलो तरीही आणि हरलो तरीही टाळणं आवश्यक आहे. नेते आणि कार्यकर्ते यांची पारख कधी होते? जेव्हा आपण जागा हरतो. २०१९ मध्ये जेव्हा विजय मिळवून सरकार गेलं तेव्हाही अनेकांची पारख झाली. आत्ताही तशीच पारख झाली. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशातल्या चार राज्यांमध्ये अपेक्षानुरुप निकाल आला असता तर छात्या बडवणारे वेगळ्या प्रकारे छात्या बडवताना दिसले असते. इतिहासातून शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. आपण तसेच पुढे जात आहोत.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.