महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “विरोधक आंदोलनांच्या भरवशावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहेत,” असा थेट आरोप करत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पळपुटेपणा सोडून संसदेत समोरासमोर चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले. “जर तुमची लोकशाही आणि संविधानावर निष्ठा असेल, तर विरोधकांनी चर्चेपासून दूर का पळावे?” असा सवालही मुख्यमंत्र्यांनी या वेळी उपस्थित केला.

राहुल गांधींवर घणाघात

राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधी हे अराजकतावादी मानसिकतेतून काम करत आहेत. कर्नाटक आणि पंजाब या काँग्रेसशासित राज्यांमध्येही पेपर फुटीच्या घटना घडल्या आहेत, पण काँग्रेस यावर केवळ राजकारण करत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शिक्षणाचे बजेट अत्यंत कमी होते, जे आमच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे.”

राज ठाकरे व शरद पवार यांच्यावर टिप्पणी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले, “जेव्हापासून राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील अंतर वाढले आहे, तेव्हापासून राज ठाकरेंना सगळीकडे ‘जंतर-मंतर’च दिसत आहे.”

CJP आंदोलनातील कलाकारांच्या सहभागावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

सध्या सुरू असलेल्या आंदोलनांमधील कलाकारांच्या सहभागावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. “आंदोलनामध्ये सर्व प्रकारच्या प्रवृत्ती असतात. अनेक कलाकार अतिशय चांगल्या भावनेने आणि प्रामाणिकपणे आंदोलनात उतरले आहेत. मात्र, दुर्दैवाने अनेक जण केवळ ‘रील’ बनवण्यासाठी आणि आंदोलनाचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करताना दिसत आहेत,” असे ते म्हणाले.

ठाकरे सरकारवर TET घोटाळ्याचा आरोप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस यांनी TET परीक्षेतील गैरव्यवहाराची आठवण करून दिली. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात आतापर्यंतचा सर्वांत मोठा TET (शिक्षक पात्रता परीक्षा) घोटाळा झाला होता,” असा टोला त्यांनी लगावला.