scorecardresearch

रायगडमधील संशयित बोटीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती; म्हणाले, “ही बोट…”

आज सकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या आहेत.

रायगडमधील संशयित बोटीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती; म्हणाले, “ही बोट…”

आज सकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. दरम्यान, या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे. ”ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची असून बोटीचे इंजिन बिघडल्याने ती रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंगत आली”, असे ते म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

”आज श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट स्थानिकांना आढळून आली आहे. त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बोटीचा पाहणी केली असता, या बोटीत ३ एके-४७ रायफल आणि काडतूस तसेच बोटीची कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर तत्काळ हायअलर्ट जारी करण्यात आला. तसेच याची माहिती भारतीय कोस्टगार्ड आणि इतर यंत्रणांनाही देण्यात आली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा – “मुख्यमंत्री महोदय..हे वागणं बरं नव्हं, आपल्याला पुन्हा एकत्र…”; विधानसभेत अजित पवारांची टोलेबाजी!

पुढे ते म्हणाले, ”आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव लेडीहान असून ती एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची आहे. हाना लॉडर्सगन असं या ऑस्ट्रेलियन नागरिकाचे नाव असून ती एक महिला आहे. तीचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान आहेत. ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. मात्र, बोटीचे इंजिन बिघडल्याने बोटीवरील सर्वांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. त्यामुळे ती बोट रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आली”, अशी माहिती देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा – “तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल” नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं, म्हणाल्या…

या घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis statement on suspicious boat found in raigad spb