पंढरपूर : शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शेतीच्या क्षेत्रात यावर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार अशी २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व संतांनी निसर्गप्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून वारकरी करतात, असे फडणवीस म्हणाले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजित मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजित पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाले, शेतीच्या क्षेत्रात यावर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार अशी २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, पंप आदी देण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. तर कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, वारकरी आणि शेतकरी हे वारीच्या दोन बाजू आहेत. शेतीत येणाऱ्या तंत्रज्ञानाची वारीत सहभागी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी चांगले प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शेती चांगली आणि सुरळीत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ही बाजार समिती एक अग्रेसर बाजार समिती आहे. ५५० कोटींच्या वर उलाढाल या बाजार समितीच्या माध्यमातून केली जाते असेही ते म्हणाले.

पंढरपूर पंचायत समिती आवारात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्यावतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ‘निर्मल दिंडी’ तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा’उपक्रम आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाला. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणनमंत्री जयकुमार रावल, कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस लावून पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा विचार करून २०१८ पासून निर्मलवारी सुरू केली. याअंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. महिलांची मोठ्या प्रमाणात सोय झाल्यामुळे वारीमध्ये त्यांची संख्या वाढलेली आहे. आपली वारी निर्मल, स्वच्छ झाली आहे.