Devendra Fadnavis महाराष्ट्रातल्या त्रिभाषा सूत्रातील हिंदी किंवा अन्य भाषा शिकण्यासंबंधीचे दोन शासन आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २९ जूनच्या संध्याकाळी मागे घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा म्हणजे अफवांची फॅक्टरी आहे अशी टीका केली होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी…

फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून थांबलेली नाही. लोकसभेला फेक नरेटिव्हच्या मदतीने यांनी एक यश मिळवलं पण विधानसभेला आपण त्यांना थेट नरेटिव्हने उत्तर दिलं. आता महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आता महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरु झाला आहे. अशी भाषणं आता ऐकायला मिळणार आहेत. तुमच्यातही ही ताकद नाही आणि कुणाच्या बापामध्ये ही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकाल असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपाचा उल्लेख अफवांची फॅक्टरी असा केला होता. त्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिलं आहे.

भाजपाने मुंबईचा चेहरामोहरा बदलला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “भाजपाचं सरकार आल्यानंतर मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला. मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजून तुम्ही अंडी खात राहिलात आणि शेवटी ती कोंबडी चिरण्याचं कामही तुम्ही केलंत. मुंबईतल्या मराठी माणसाला, गिरगावातल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं. तुम्ही केवळ मराठीच्या नावावर राजकारण करत राहिलात. मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. अभ्युदय नगर, बीडीडी चाळ या ठिकाणी राहणाऱ्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो.” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

हिंदी अनिवार्य करायची हा अहवाल उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातलाच-फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला तर लक्षात येत नाही यांना लाज का वाटत नाही? आपण जे केलं त्याच्याचविरोधात बोलायचं आणि जिंकलो जिंकलो सांगायचं. देशात त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे यासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारने समिती तयार केली. समितीचा अहवाल आला. त्यात सांगण्यात आलं होतं पहिली ते बारावी ते हिंदी अनिवार्य करा. उद्धव ठाकरेंनी नेमलेल्या समितीने हे सांगितलं. तो अहवाल उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली. आपल्या सरकारने तिसऱ्या भाषेने निर्णय केला की हिंदी किंवा कुठलीही भाषा शिकता येईल तेव्हा हिंदी सक्तीचं बोलणं सुरु केलं. मराठीची सक्तीच फक्त महाराष्ट्रात आहे. पण आम्हाला हिंदीचा अभिमान आहे. भारतातल्या प्रत्येक भाषेचा आम्हाला अभिमान आहे. हिंदीचा विरोध करुन इंग्रजीला पायघड्या घालणारे आम्ही नाहीत. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही समिती तयार केली आहे. मराठी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ. कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे यासाठीच आम्ही राजकारण करतो-फडणवीस

आपल्या भाषणात पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणाची युती झाली पाहिजे, कुणाची अयुती झाली पाहिजे यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही. महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे म्हणून आम्ही राजकारण करतो आहोत. महाराष्ट्रात राहणाऱ्या युवांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी आम्ही १६ लाख कोटींचे करार करुन आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आम्ही आणलं. या देशात जी थेट विदेशी गुंतवणूक येते त्यात पहिल्या क्रमांकावर आम्ही महाराष्ट्राला आणून दाखवलं. असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्ही परिवर्तन घडवण्यासाठी सत्ता हातात घेतली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा कुठलाही भाग असो दुष्काळाला भूतकाळ करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. आम्ही बोलबच्चन भैरवी नाही. मोठी भाषणं करायची आणि कर्तृत्वशून्य आम्ही नाही. ये पब्लिक है सब जानती है.” महायुतीचे तीनही पक्ष नवा महाराष्ट्र घडवायचा निघालो आहोत. मोदींच्या विकसित भारताचं स्वप्न आहे त्याबरोबर विकसित महाराष्ट्र करुन दाखवू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज रविंद्र चव्हाण यांनी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण केलं.