CM Devendra Fadnavis Maharashtra Budget: विधानसभेत आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी आपल्या भाषणात राज्यावर वाढलेल्या कर्जाचा मुद्दा पुढ केला होता. यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनील प्रभू यांच्या संपत्तीचा दाखल दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्रभू साहेब मी तुमचे निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र तपासले. तुमच्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती १४ कोटी आणि कर्ज ३.५४ लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. कर्जाचा विचार केल्यास तुमच्यावर २५.२८ टक्के दायित्व आहे. एवढ्या दायित्वामुळे तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? हे शक्यच नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, प्रभू यांना एवढ्याशा कर्जामुळे नादारी घोषित करावी लागणार नाही. त्याचप्रमाणे राज्यावर १८ टक्केच कर्ज आहे. त्यामुळे प्रभू यांच्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती थोडी उत्तम आहे.
नॉर्वे, थायलंडपेक्षाही आपली मोठी अर्थव्यवस्था
महाराष्ट्र हे राष्ट्र असते तर आपण जगातून सर्वात मोठी तिसावी अर्थव्यवस्था असतो, असेही फडणवीस यांनी सांगितले. याची सविस्तर माहिती देताना त्यांनी म्हटले, “पहिल्या ३५ देशांचा विचार केला तर महाराष्ट्राने ऑस्ट्रीया, थायलंड, फिलिपिन्स, नॉर्वे, व्हिएतनाम आणि बांगलादेश यांच्यापेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. आपला विकासदर आपण कायम राखू शकलो तर पुढच्या दोन ते तीन वर्षात युएई आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थानांही आपण मागे टाकू शकू.”
आपल्या अर्थव्यस्थेचा विस्तार किती झाला? याची माहिती देताना फडणवीस म्हणाले, “२०१३-१४ साली राज्याचा जीएसडीपी १६ लाख कोटी रुपये होता. गेल्या १० वर्षात राज्याचा जीएसडीपी १६ लाख कोटींहून ५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. १० वर्षांत तीन पट अधिक वाढ झाली आहे.”
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमाकांवर
राज्याचे दरडोई उत्पन्न ३ लाख १७ हजार ८०३ रुपयांवरून ३ लाख ४७ हजार ९०३ रुपये इतके वाढलेले दिसत आहे. मात्र दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमाकांवर आहे, हेदेखील खरे आहे. पण आपल्या राज्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार केला तर आपला विकासदर चांगला असल्याचे दिसते. राज्य जितके मोठे तेवढा विकासाचा दर कमी असतो, पण महाराष्ट्राने आपला विकासदर कायम ठेवला आहे, अशी माहिती यावळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
