महाराष्ट्रात सध्या अशोक खरातच्या अटकेचं प्रकरण चांगलंच गाजतं आहे. अशोक खरातला महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात आणि बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनाही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अशोक खरात प्रकरणावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा चालवत आहेत. ते अशोक खरातला पाठिशी घालणार नाहीत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करते. अशोक खरातसारख्या विकृत माणसाला देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार नाहीत. नरेंद्र दाभोलकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची हत्या झाली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाभोलकरांचा वारसा पुढे नेत आहेत. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानते, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला-सुळे

अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. संसदेतील खासदार मला एकच प्रश्न विचारत आहेत की, महाराष्ट्रात काय घडते आहे? आम्ही कमी पडलो, त्यामुळे महिलांना अशा ठिकाणी जाण्याची वेळ येते. समाज म्हणून आमची काहीतरी जबाबदारी आहे. अनेक वेळा लोक आम्हाला भेटतात , ते आमच्यासोबत फोटो काढतात. मला अशोक खरात प्रकरणात कोणाला वाचवायचे नाही. मात्र, त्याच्यासोबत फोटो काढणाऱ्या नेत्यांनाही याबद्दल माहिती नसेल. पण इथून पुढे कोणासोबतही फोटो काढताना आम्हाला विचार करावा लागेल. अशोक खरात याच्याबाबत अगोदरपासून माहिती असती तर असे गलिच्छ काम करणाऱ्याला पाठिशी घातले गेले नसते, असा माझा विश्वास असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर यांच्या विषयी काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी सध्या अशोक खरात प्रकरणामुळे संकटात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबाबतही भाष्य केलं. याबाबत त्यांच्या पक्षाला प्रश्न विचारला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोपटे शरद पवार यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले. पवार आणि ठाकरे यांचे पक्ष फोडण्यात आले. त्यांनी शून्यातून पक्ष निर्माण केला ही त्यांची चूक होती का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.