अमरावतीमधील हिंसक घटनांवर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “त्रिपुरात असं काही घडलंच नाही, हे एक सुनियोजित षडयंत्र”!

सरकारी पक्षाचे नेते स्टेजवर जाऊन भडकवणारी भाषणं करणार असतील, तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर येणार आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

devendra fadnavis on amravati violence new
देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसक घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आज सकाळपासून अमरावतीमधील बंदला लागलेल्या हिंसक वळणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी रझा अकादमीने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. आज अमरावतीमध्ये अशाच प्रकारे मोर्चामध्ये दगडफेक आणि तोडफोड झाल्यानंतर हा मोर्चा हिंसक वळणावर गेला. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करून जमावाला नियंत्रणात आणावं लागलं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला असताना अमरावतीमधील संपूर्ण प्रकरणावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

न घडलेल्या घटनेवर मोर्चे!

देवेंद्र फडणवीसांनी त्रिपुरामध्ये अशी कोणती घटनाच घडली नसल्याचं सांगितलं आहे. त्रिपुरामध्ये मशीद जाळण्यात आल्याच्या प्रकरणाचा निषेध म्हणून हे मोर्चे काढले जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “अमरावतीमधील एकूणच घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. पहिल्यांदा सर्वांना विनंती करतो की अमरावतीत शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार करू नये. पण ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही, त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणं अत्यंत चुकीचं आहे”.

“चुकीचे फोटो पसरवले गेले”

सोशल मीडियावर चुकीचे फोटो व्हायरल करून हा सगळा प्रकार घडवण्यात आल्याचं हे षडयंत्र असल्याचा दावा यावेळी फडणवीसांनी केला. “त्रिपुरा सरकार आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वत: जी मशीद जाळली होती म्हणून ही सगळी आंदोलनं होत आहेत, त्या मशिदीचे फोटो जारी केले आहेत. शिवाय सोशल मीडियावर कशा प्रकारे हे खोटे फोटो टाकण्यात आले हे देखील प्रकाशित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर पेटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई देखील केली आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“लढण्यासाठी भाजपा कधीच स्वत:चं हत्यार वापरत नाही, त्यांच्याकडे स्वत:चं हत्यारच नाही”, संजय राऊतांची खोचक टीका!

“…तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर”

दरम्यान, अफवांवर विश्वास ठेऊन मोर्चे काढतानाच हिंदूंची दुकानं टार्गेट करणं चुकीचं असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. “कोणतीही मशीद त्रिपुरामध्ये जाळण्यातच आलेली नाही. असं असताना त्या अफवांवर महाराष्ट्रात मोर्चे काढायचे आणि त्यावर हिंदूंची दुकानं जाळायची हे देखील योग्य नाही. सरकारने यावर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारी पक्षाचे नेते स्टेजवर जाऊन भडकवणारी भाषणं करणार असतील, तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे कुणीही महाराष्ट्रात दंगल करू नये आणि अशा प्रकारे मोर्चे काढून विनाकारण हिंदूंची दुकानं टार्गेट करणं हे देखील बंद झालं पाहिजे आणि दोन्ही समाजांनी शांतता पाळली पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis targets amravati violence as plan incdent raza academy pmw

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या