महाविकासआघाडी सरकारने आज मुंबईकरांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिली. तर, महाविकासआघाडी सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“२०१७ चे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले! देर आए दुरुस्त आए… !” असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसत आहे.

फडणवीसांनी या ट्विटसोबतच नुकत्याच संपलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्य्यावरून सभागृहात मांडलेल्या आपल्या भूमिकेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

या व्हिडिओत फडणवीस म्हणतात, “ कोविडमुळे जनमाणसावर, लोकांच्या कामावर, उद्योगधंद्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थतीत जर जमिनीचं भांडवली मूल्य हे यावर्षी आपण वाढवलं तर लोकांचे कर देखील वाढतील. परंतु, माझं तर मत असं आहे की या पलीकडे जाऊन, मुंबई महापालिका जी देशातील सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे आणि असं आम्ही ऐकतो की ७८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी या महापालिकेकडे आहेत. अशा परिस्थिती, या कोविडच्या सगळ्य परिस्थितीत शैक्षणिक संस्था, विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था यांना मोठ्याप्रमाणात सूट दिली पाहिजे. कारण, तुम्ही हा तक्ता बंद करून मागच्यावेळी एवढच भांडवली मूल्य ठेवलं तरी मागील एवढाच त्यांना कर येणार आहे. त्यामुळे सवलत कुठलीच नाही, वाढ होणार नाही एवढच यामाध्यमातून आपण खात्री करतोय. खरंतर या निमित्त मंत्रीमोहदय मी आपल्याला आठवण करून देतो, की आपल्या पक्षाचा जाहीरनामा असा होता की, मुंबईत ५०० फुटांपर्यंत आम्ही कर माफ करू. आपण ५०० फुटापर्यंत असं म्हटलं नव्हतं की नुसती घरपट्टी माफ करू. आपण असं आश्वासन दिलं होतं की ५०० फुटांपर्यंत आम्ही कर माफ करू आणि मग आपण हळूच त्यात पळवाट शोधून काढली आणि त्यातला सगळ्यात लहान घटक जो असतो, तो घटक आपण माफ केला. अशाप्रकारे तुम्ही घोषणा केली एक, सांगितलं ५०० फुटांपर्यंत कर माफ आणि सामान्य माणसाला वाटलं राजा उदार झाला, नंतर लक्षात आलं हाती भोपळा दिला. हा राजा उदार नाही उधार झाला आहे, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी झाली आहे.”

तसेच, “पहिल्यांदा तर हे जे आश्वासन आपण दिलं होतं, की ५०० फुटांपर्यंत कर माफ करण्यात येईल. या संदर्भात आज पुन्हा आश्वासन दिलं पाहिजे की हो आम्ही आश्वासन दिलं होतं, आम्ही चुकलो आम्ही त्यामधला छोटा घटक केवळ माफ केला. मोठा घटक आम्ही माफ करू शकलो नाही पण आता करू. कारण, आता कोविडमध्ये मुंबई महापालिकेकडून ही अपेक्षा होती की एकतर ५०० फुटांपर्यंतचा संपूर्ण कर माफ होईल केवळ कॅपिटल व्हॅल्यू फ्रीज करून नाही, तर कोविडमध्ये लोकांचं झालेलं नुकसान पाहता मी इतर महापालिकांना म्हणाणार नाही कारण त्यांची परिस्थिती कदाचित तेवढी चांगली नसेल. पण मुंबई महापालिकेकडे ७८ हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यामुळे या विधेयकाच्या माध्यामातून दोन बदल आपण केले पाहिजेत, पहिलं तर या विधेयकात आपण दुरुस्ती करून या ठिकाणी जमिनीचं भांडवली मूल्य जसे होते तसेच राहणार या ऐवजी या वर्षापुरतं ते ५० टक्के मोजले जाईल, अशा प्रकारची एक दुरुस्ती करावी. म्हणजे लोकाना त्यातून काहीना काही दिलासा मिळेल. दुसर म्हणजे जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे ५०० फुटांपर्यंत कुठल्याच प्रकरचा कर घेणार नाही, अशाप्रकारची देखील दुरूस्ती आपण या कायद्यात करावी. दुरूस्ती आताही जरी आणली तरी आम्ही आपल्याला पूर्ण समर्थन देऊन एकमताने हे विधेयक मान्य करू.” असंही यावेळी फडणवीस म्हणाल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या सर्व घरांचा मालमत्ता कर माफ

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या आजच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या तत्काळ अंमलबजावणी करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहे. या निर्णयामुळे साधारणत: १६ लाख कुटुंबांना फायदा होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis targets thackeray government msr
First published on: 01-01-2022 at 19:41 IST