उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर पडदा पडला. महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, याआधीच देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या विधानाचे मीम्स आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागले होते. २०१९मध्ये फडणवीसांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर देखील यावरून बरेच मीम्स झाले होते. बुधवारी रात्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुमत चाचणी स्थगित करावी किंवा पुढे ढकलावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या उद्धव ठाकरे सरकारला न्यायालयाने मोठा दणका दिला. चाचणी होणारच, असं शिक्कामोर्तब न्यायालयाने केल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी आपण मुख्यमंत्रीपदासोबतच विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा देत असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. यानंतर भाजपाच्या गोटात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. भाजपाच्या सर्वच नेत्यांनी आनंद होत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, या सर्व गोंधळामध्ये भाजपानं देवेंद्र फडणवीसांच्या त्या घोषणेचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेलाच एका कवितेचं स्वरूप देऊन ती कविता फडणवीसांच्या आवाजात म्हटली आहे.

काय आहे ही कविता..

व्हिडीओची सुरुवात फडणवीस विधानसभेत बोललेल्या वक्तव्यापासून करण्यात आली आहे. यात फडणवीस म्हणतात, “शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन…”

मी पुन्हा येईन… याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी.. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…

मी पुन्हा येईन.. गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी..

मी पुन्हा येईन.. माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी..नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी..

मी पुन्हा येईन..याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी..प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत.. माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रुप देण्यासाठी.. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी… मी पुन्हा येईन!

व्हिडीओच्या शेवटी ‘पुन्हा आणुया आपले सरकार’ असा संदेश देखील लिहिण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis video mi punha yein bjp celebration uddhav thackeray resign pmw
First published on: 30-06-2022 at 11:15 IST