Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर पुढचे तीन दिवस म्हणजेच २८ जानेवारी, २९ आणि ३० जानेवारी या दिवशी २० शिक्षणसंस्थांच्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं प्रकरण उघडकीस आलं. ज्या कुणी गडबड केली त्यांना सोडणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं प्रकरण नेमकं काय?

२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी अपघात झाला. विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. विमानात अजित पवारांसह उपस्थित असलेल्या सगळ्यांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच मंत्रालयात वेगाने चक्रं फिरली आणि २० संस्थांच्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. अल्पसंखअयाक विकास विभागाकडून अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देणं अपेक्षित होतं. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ही मंजुरी दिली. विशेष बाब म्हणजे १२ ऑक्टोबर २०२५ ला माणिकराव कोकाटेंनी या प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिली होती. कोकाटेंना मंत्रिपद सोडावं लागल्यानंतर हा विभाग अजित पवारांकडे होता. त्यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांतच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा प्रताप केल्याचं समोर आलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं कारवाईचं आश्वासन

हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली. प्रत्येक फाईलमागे २५ लाखांची देवाण-घेवाण झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. आता या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या फाईल्सना मंजुरी देण्यात आली होती त्यांना आता स्थगिती देण्यात आली आहे. त्याचसोबत ज्याने ही गडबड केली आहे त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा आता मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुंबईत पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं आहे. दरम्यान, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवारांनी भेटीसाठी बोलावून घेतलं. यावेळी सुनेत्रा पवार यांनी अल्पसंख्याक संस्थानमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती घेतली आहे.

चार दिवसांत ७५ प्रमाणपत्रांचं वाटप

२८ जानेवारीला एकूण ७ संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप

२९ आणि ३० जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना दर्जा

२ फेब्रुवारी: पुन्हा अनेक शाळांना दर्जा

अनेक प्रमाणपत्रे शासकीय वेळ संपल्यानंतर संध्याकाळी ६.४५ ते ६.५८ दरम्यान
७५ पैकी २५ शाळा पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या २९ जानेवारीला एकाच दिवशी देण्यात आली. तर सेंट झेवियर्सच्या ५ शाळांना दर्जा देण्यात आला.

स्वामी शांती प्रकाश व देवप्रकाश संस्थांच्या ४ शाळांना प्रमाणपत्रं देण्यात आली.