राज्यात भाजपाची सत्ता आली तर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील अशी भविष्यवाणी ज्योतिष परिषदेने वर्तवली आहे. ठाण्यातील ब्राह्मण सभा मंडळ या ठिकाणी ज्योतिष अधिवेशन पार पडले. या वेळी २०१९ च्या निवडणुका या सत्रात पुण्याचे सिद्धेश्वर मारकटकर यांनी काही राजकीय भाकिते मांडली. महाराष्ट्रात जे असंतोषाचे वातावरण आहे ते निवळण्यास ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा कालावधी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिवसेना-भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी यांची युती आणि आघाडी होणार का? मुख्यमंत्री कोण होणार? केंद्रात कोणाचे सरकार येणार या प्रश्नांवरही त्यांनी उत्तरे दिली आणि आपले अंदाज वर्तवले.

२०१९ मध्ये भाजपाची सत्ता येईल का? असे विचारले असता भाजपाला बहुमत मिळणे कठीण आहे मात्र मित्र पक्षांच्या साथीने भाजपा पुन्हा सत्तेत येईल. तर राज्यात विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत झाली तर भाजपा राज्यात सत्तेत येईल असा अंदाजही यावेळी वर्तवण्यात आला. २०१९ ला काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतील का असे विचारले असता त्यांची आघाडी होईल आणि त्यांना जास्त जागा मिळतील असेही भविष्य परिषदेत म्हटले गेले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईल का? असा प्रश्न विचारला असता त्यांची पत्रिका चांगली आहे त्यामुळे ते आपला कार्यकाळ पूर्ण करतीलच शिवाय २०१९ मध्ये ते केंद्रात जाऊ शकतात. ते केंद्रात गेल्यावर जर भाजपाची राज्यात सत्ता आली तर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री होतील असाही होरा यावेळी वर्तवण्यात आला. जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या झाल्या तर महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीला जास्त संधी असून अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील असाही अंदाज भविष्य परिषदेने वर्तवला.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? हे विचारले असता भाजपाची सत्ता आल्यास पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील कारण त्यांच्या पत्रिकेत तो योग आहे असेही भविष्य परिषदेने म्हटले आहे. तर राहुल गांधी यांचा पंतप्रधान होण्याचा योग यावेळी नाही असेही ज्योतिष परिषदेने म्हटले आहे. मात्र त्याचसोबत लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.