scorecardresearch

“दाऊदच्या नातेवाईकासह देवेंद्र फडणवीस”; विधानसभेतील आरोपांनंतर नवाब मलिकांच्या मुलीने ट्वीट केला फोटो

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांनंतर आता मलिकांच्या मुलीने प्रत्युत्तर दिले असून एक फोटो ट्विट केला आहे.

Devendra Fadnavis with Dgang relatives Nawab Malik daughter tweeted a photo
(फोटो सौजन्य – @sanamalikshaikh)

गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह सादर केला होता. यामध्ये त्यांनी थेट विशेष सरकारी वकिल प्रविण चव्हाण यांच्यावर देखील फडणवीसांनी गंभीर आरोप केले होते. प्रविण चव्हाण यांच्यामार्फत भाजपा नेत्यांना विविध प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर सोमवारी पुन्हा फडणवीसांनी आणखी एक पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केला आहे. यावेळी फडणवीसांनी दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं असा आरोप केला आहे. त्यावर आता मलिकांच्या मुलीने देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले असून एक फोटो ट्विट केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये सादर केलेल्या पेनड्राईव्हमध्ये एक ऑडिओ क्लिप असून ती डॉ. मुदस्सीर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संभाषणाची असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. मुदस्सीर लांबे यांचे संबंध दाऊदशी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी त्यांच्या विरोधात एका ३३ वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबे यांनी लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असं फडणवीसांनी सांगितलं.

त्यावर आता नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक  यांनी ट्विटद्वारे उत्तर दिलं आहे. सना मलिक यांनी मुद्दस्सिर लांबे हे वक्फ बोर्डात कधी दाखल झाले याची तारीख समोर आणली आहे. याशिवाय त्यांनी मुद्दस्सिर लांबे यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ट्विट केला आहे.

“अर्धसत्य हे पूर्ण खोट असतं. डॉ. लांबे यांची १३ सप्टेंबर २०१९ रोजी फडणवीस/भाजपा सरकारने वक्फ बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महाविकास आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर २०१९ मध्ये झाली. माझ्या वडिलांना जानेवारी २०२० च्या पहिल्या आठवड्यात अल्पसंख्याक/वक्फ विभाग मिळाला. देवेंद्र फडणवीस दाऊदच्या नातेवाईक आणि बलात्काराच्या आरोपीसह,” असं सना मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“माझ्या वडिलांना इंदिरा गांधींनी दोन वर्षे तुरुंगात ठेवले होते त्यामुळे…”; चौकशीनंतर फडणवीसांचे विधानसभेत प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एक पेन ड्राईव्ह सादर केला. “या पेनड्राईव्हमधील संभाषणात दोन पात्र आहेत. त्यापैकी एक आहे मोहम्मद अरशद खान आणि दुसरे म्हणजे ज्यांना तुमच्या सरकारमधील अल्पसंख्याकमंत्र्यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून घेतलं आहे असे डॉ. मुदस्सीर लांबे. ३१ डिसेंबर २०२० रोजी डॉ. लांबे यांच्याविरोधात एका सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्या असं म्हणतात, की जेव्हा तक्रार करण्याचा इशारा दिला तेव्हा डॉ. लांबे यांनी लग्न करण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. यानंतर त्या महिलने तक्रार दिली. २८ जानेवारी २०२० रोजी ही घटना घडली आणि लग्नाच्या आश्वासनामुळे ऑक्टोबर २०२० पर्यंत त्यांनी पोलीस तक्रार करण्याची वाट पाहीली, असं त्यांनी म्हटलंय. ही घटना घडल्यानंतर या महिलेच्या पतीने तिला घटस्फोट दिला असंही म्हटलं आहे. या महिलने आत्महत्या करण्याच इशारा दिला त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. आता बलात्काराची तक्रार होऊन देखील डॉ. लांबे बाहेर आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. परंतु डॉ. लांबे यांनी या महिलेच्या पती विरुद्ध चोरीची तक्रार केली आणि तो आता अटकेत आहे. २८ जानेवारी २०२२ रोजी ही तक्रार शीळ नायगर पोलीस स्टेशन ठाणे, या ठिकाणी झाली या सगळ्यांची प्रती माझ्याकडे आहेत,” असे फडणवीस म्हणाले.

“वक्फ बोर्डावर नियुक्त केलेले डॉ. लांबे हे आपला विस्तृत परिचय देत असल्याचा ऑडिओ या पेनड्राईव्हमध्ये देखील आहे. डॉ. लांबे यांचा मोहम्मद अरशद खानशी झालेला संवाद त्यामध्ये आहे. परिचया व्यतिरिक्त वक्फ बोर्डात कमाई कशी करायची याची विस्तृत उल्लेख त्यामध्ये आहे,” असंही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis with dgang relatives nawab malik daughter tweeted a photo after the allegations in the assembly abn

ताज्या बातम्या