एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अहमदनगरमध्ये एका एसटी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

राज्यात आज अहमदनगर येथे अत्यंत खळबळजनक अशी घटना घडली. दिवाळी अवघी काही दिवसांवर आलेली असताना एका एसटी कर्मचाऱ्याने चक्क एसटी बसच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीला गळफास लावून आत्महत्या केली. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप काकडे असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे शेवगाव आगरात आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. दिलीप काकडे यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आज नगरमधील एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या, यापूर्वी २८ एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या, अनियमित वेतनाच्या समस्या, त्यामुळे कर्मचार्‍यांचे अतोनात हाल या सार्‍याच बातम्या अत्यंत वेदनादायी आहेत. राज्य सरकारने या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्वरित त्याचे निराकरण करावे! ” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

तर, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील या घटनेवरून महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.“एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू सांगायचं तर दुसऱ्या बाजूला कर्मचारी वैफल्यानं आत्महत्या करत आहेत. आतातरी सरकार जाग होणार आहे की नाही? जर एसटी कर्मचाऱ्यांच्या अशाच आत्महत्या होत राहिल्या तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार राज्य सरकारचं असेल.” असं दरेकर म्हणाले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता वाढ आणि घरभाडे भत्ता वाढ या मागण्यांसाठी नुकतंच काम बंद आंदोलन सुरू झालं होतं. मात्र, राज्य शासनाने यातील काही मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. दिलीप हरिभाऊ काकडे हे महाराष्ट एसटी कामगार संघटनेचे सदस्य होते. ५६ वर्षीय दिलीप काकडे यांनी बसच्याच मागच्या शिडीला गळफास घेत आत्महत्या केल्यानं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnaviss first reaction to the suicide of an st employee msr

ताज्या बातम्या