सावंतवाडी : ‘आंबा पिकतो रस गळतो’ अशी म्हण असली, तरी यंदाच्या हंगामात आंबा सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नव्हता. मात्र, आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात आंब्याची आवक कमी होत असतानाच दरही घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना हापूस खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
उत्पादनात मोठी घट आणि साक्याचा प्रादुर्भाव:
यंदाच्या हंगामात हवामानातील बदलांचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे देवगड हापूसच्या उत्पादनात तब्बल ९० टक्क्यांपर्यंत घट झाली असून, यंदा केवळ १० टक्केच उत्पादन झाल्याची माहिती बागायतदारांनी दिली आहे.
तसेच, आंब्यात ‘साका’ (आतील गर पांढरा आणि आंबट होणे) निघण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे २० ते ३० टक्के आंबा खराब निघत असून, बागायतदार चिंतेत आहेत. याशिवाय, अंतिम टप्प्यात फळमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बागायतदारांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
कर्नाटक हापूसचा धोका आणि ग्राहकांना आवाहन
बाजारात हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने फळाचा दर्जा घसरत आहे. त्यामुळे ग्राहकांनी केवळ ओळखीच्या आणि विश्वासू विक्रेत्यांकडूनच आंबा खरेदी करावा, असे आवाहन विविध आंबा बागायतदार संघांकडून करण्यात आले आहे.
पर्यटकांचा हिरमोड आणि कॅनिंग उद्योगाला गती:
मे महिन्यात कोकणात येणारे चाकरमानी आणि पर्यटक हापूसचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात. मात्र, यंदा उत्पादनात कमालीची घट झाल्यामुळे पर्यटकांनाही हवा तसा आंबा मिळणे कठीण झाले आहे. हंगाम संपत आल्याने आणि फळमाशीचा प्रादुर्भाव वाढल्याने उरलेला आंबा कॅनिंग (प्रक्रिया) उद्योगाकडे वळवला जात आहे.
देवगड आणि वेंगुर्ले परिसरात कॅनिंग व्यवसायासाठी आंबा गोळा करण्याची बागायतदारांची धावपळ सुरू आहे. कॅनिंगसाठी ४२ ते ४४ रुपये प्रति किलोचा दर मिळत असून, वेंगुर्ले भागात हा दर २८ रुपये प्रति किलोपर्यंत आहे. या प्रक्रियेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीस मदत होत आहे.
सध्या सावंतवाडीच्या स्थानिक बाजारपेठेत आंबा बागायतदारांकडून फळांच्या आकारानुसार ३०० ते ७०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीला दुसऱ्या टप्प्यातील आंब्याला १५०० रुपये, त्यानंतर १२०० व १००० रुपये डझन असा दर मिळाला होता. आता हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने बाजारात आंबा कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध आहे.
