सावंतवाडी:- देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे वनविभागाने केलेल्या एका धडक कारवाईत तब्बल ८ कोटी रुपये किंमतीचे ८ किलो ८०० ग्रॅम वजनाचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघा संशयितांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून, देवगडमध्ये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांना ३० एप्रिल रोजी तळेबाजार परिसरात अंबरग्रीस विक्रीसाठी काही इसम येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने सहायक वनसंरक्षक डॉ. एस. के. लाड यांच्या नेतृत्वाखाली आणि कणकवली वनक्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला. संशयित इसम विक्रीसाठी ठिकाणी दाखल होताच पथकाने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी
योगेश गणपत करंजेकर (वय ४२, रा. इळये),विष्णू धाकू धुरत (वय ३३, रा. आनंदवाडी),व संतोष काशीराम नाडणकर (वय ५६, रा. वरेरी) यांचा समावेश आहे. अंबरग्रीसच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांविषयी कोणतीही माहिती असल्यास ती सावंतवाडी वनविभागाला कळवावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच, माहिती देणाऱ्यांची नावे पूर्णपणे गुप्त ठेवली जातील, असे स्पष्ट केले आहे.
