रत्नागिरी – कोकणच्या मातीत खोलवर रुजलेल्या श्रद्धेचा आणि मानाचा लोकदेव शंखासूर (संकासूर) याचे ‘देवखेल’ या वेबसीरीजमध्ये विकृत व गुन्हेगारी स्वरूपात सादरीकरण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरीतील प्रसिद्ध बौद्धिक संपदा व सायबर कायदेतज्ज्ञ अॅड. अमित नागवेकर यांनी झी५, संबंधित दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कडक कायदेशीर नोटीस बजावली आहे.
झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘देवखेल’ वेबसीरीजमध्ये तसेच तिच्या प्रसिद्धी साहित्यामध्ये शंखासूर या लोकदेवतेचे चित्रण एका भयानक ‘सिरीयल किलर’च्या रूपात करण्यात आले आहे. प्रत्यक्षात, कोकणात शंखासूर ही शिमगोत्सव व नमन परंपरेतील पवित्र लोकदेवता असून, वाईट प्रवृत्तींचा नाश करणारा रक्षक देव म्हणून तिची श्रद्धेने पूजा केली जाते. अशा देवतेचे व्यावसायिक फायद्यासाठी ‘गुन्हेगारीकरण’ केल्याने संपूर्ण कोकण पट्ट्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अॅड. नागवेकर यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये निर्मात्यांवर विविध गंभीर कायदेशीर कलमांखाली आक्षेप नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेतील कलम २९५(अ) अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून, लोकदेवतेचे हिंसक चित्रण करून कोकणातील श्रद्धाळू समाजाच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच कलम १५३(अ) अंतर्गत समाजात तेढ आणि अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, आयटी नियम २०२१ अंतर्गत डिजिटल माध्यमांवरील आचारसंहितेचा भंग झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. धार्मिक व सांस्कृतिक अवमान करणारा आशय प्रसारित करणे हे या नियमांचे थेट उल्लंघन असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शंखासूर ही कोकणची पारंपरिक सांस्कृतिक अभिव्यक्ती असून, तिच्या मूळ स्वरूपात परवानगीशिवाय बदल करणे हे सांस्कृतिक व नैतिक हक्कांवर घाला घालणारे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
“व्यावसायिक नफ्यासाठी आमच्या लोकपरंपरा आणि देवतांचे विकृतीकरण आम्ही कदापि सहन करणार नाही. ही नोटीस म्हणजे कोकणच्या समृद्ध संस्कृतीचा अपमान करणाऱ्यांना दिलेला स्पष्ट आणि कठोर कायदेशीर इशारा आहे,” असे अॅड. अमित नागवेकर यांनी ठाम शब्दांत सांगितले आहे. या प्रकरणामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्जनशील स्वातंत्र्याच्या मर्यादा, तसेच स्थानिक लोकसंस्कृतीच्या सन्मानाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

