अलिबाग : देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटनस्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, बुकिंग करणारे व्यावसायिक अशा २५ जणांविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संकेतस्थळांद्वारे आरक्षण करणाऱ्यांविरोधातही स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि कुंभे परिसरात पावसाळ्यात प्रवेशबंदीचे आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत. असे असतानाही रविवारी चाकण येथून आलेल्या २२ जणांच्या समूहाने या आदेशांचे उल्लंघन केल्याचे तपासात समोर आले आहे.

या समूहाला तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी देवकुंड धबधब्याकडे जाण्यास स्पष्ट मनाई केली होती. मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून स्थानिक मार्गदर्शक आणि संबंधित व्यावसायिकांनी पर्यटकांना पर्यायी मार्गाने धबधब्याकडे नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या दुर्घटनेत पुण्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला.

या प्रकरणी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक आणि संबंधित व्यावसायिकांविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सामाजिक माध्यमे आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून पर्यटकांची नोंदणी व आरक्षण करणाऱ्यांची माहितीही पोलिसांकडून गोळा केली जात असून, त्यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संजय बांगर यांनी सांगितले.

देवकुंडसह पावसाळ्यात धोकादायक पर्यटनस्थळी प्रवेशबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे वर्षा सहलीसाठी माणगाव परिसरातील कुंभे सिक्रेट पॉईंट आणि देवकुंड धबधबा परिसरात येण्याचा विचार करत असाल तर जरा जपून या सहलीमुळे तुमचे जीव धोक्यात येऊ शकतातच त्याशिवाय पोलीस कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.