अलिबाग : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील दोन पर्यटक पाण्यात बुडून बेपत्ता झाले. पोलिस व बचाव पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पुण्यातून १७ जणांचा एक गट पावसाळी पर्यटनासाठी देवकुंड धबधबा परिसरात आला होता.
दुपारच्या सुमारास हे पर्यटक धबधब्याजवळ फिरत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यापैकी दोघे पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून कोलाड येथील बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. दोघांचा शोध सुरू असून उशिरापर्यंत ते सापडले नव्हते.
दरम्यान, देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट आणि ‘सिक्रेट पॉइंट’ या परिसरात ३१ ऑगस्टपर्यंत पावसाळी पर्यटनास प्रशासनाने बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश माणगावचे प्रांताधिकारी यांनी यापूर्वीच जारी केले आहेत. बंदी असूनही काही पर्यटक नियमांचे उल्लंघन करून धबधबा परिसरात पोहोचत असल्याचे समोर आले आहे.
या परिसरात पोलीस व वन विभागाचा बंदोबस्त तैनात असतानाही संबंधित पर्यटक प्रतिबंधित क्षेत्रात कसे पोहोचले, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाकडून याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
