अलिबाग : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी बुडालेल्या दोन पर्यटकांचे मृतदेह सोमवारी सकाळी स्थानिक बचाव पथक आणि पोलिसांनी शोधून बाहेर काढले. गोपाळ राठोड (रा. नांदेड) आणि विष्णू ढोक (रा. हिंगोली) अशी मृतांची नावे आहेत.

रविवारी पुण्यातून सुमारे २० जणांचा गट पावसाळी पर्यटनासाठी देवकुंड धबधबा परिसरात आला होता. दुपारच्या सुमारास धबधब्याजवळ पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने गोपाळ राठोड आणि विष्णू ढोक हे दोघे पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, कोलाड येथील बचाव पथक आणि स्थानिक स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली होती. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत दोघांचा शोध लागला नव्हता.

सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. 35 जणांचे पथक या दोघांचा शोध घेत होते. अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने हे मदत व बचाव कार्य राबविण्यात आले. पाण्याखालील कॅमेऱ्यांच्या मदतीने दोघांचाही शोध घेण्यात आला. अखेर सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोघांचाही शोध लागला. स्थानिक बचाव पथके आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांत दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील कार्यवाही माणगाव पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट आणि ‘सिक्रेट पॉइंट’ परिसरात ३१ ऑगस्टपर्यंत पावसाळी पर्यटनास प्रशासनाने बंदी घातली आहे. बंदी आदेश लागू असतानाही पर्यटक प्रतिबंधित क्षेत्रात पोहोचल्याने प्रशासनाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. देवकुंड धबधब्यावर अशा घटना घडण्याची ही पहिली देण्यात नाही. दरवर्षी या ठिकाणी पर्यटक बुडून त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात.

आपत्कालीन परिस्थितीत इथे मदत व बचाव कार्यासाठी कुठलीही व्यवस्था नसते. मदत व बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य आणि प्रशिक्षित जीव रक्षक उपस्थित नसतात. त्यामुळे पर्यटकांचे जीव धोक्यात येतात. त्यामुळे या ठिकाणी मदत व बचाव कार्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी अन्यथा अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.