सिंहस्थातील पहिली पर्वणी अवघ्या काही तासांवर आली असतानाही वेगवेगळ्या घटकांमध्ये सुरू झालेले नाराज-नाटय़ कायम आहे. भाविकांना रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून शाही मिरवणुकीचे साक्षीदार होण्याचा आनंद यावेळी घेता येणार नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. सुरक्षेच्या नावाखाली प्रशासनाकडून भाविकांवर तसेच स्थानिकांवर कमालीचे र्निबध घालण्यात येत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
पर्वणीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून कमालीची खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व भाविक स्नानासाठी एकाच ठिकाणी जमू नयेत यासाठी ठिकठिकाणच्या घाटांकडे त्यांना नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साधु-महंतांच्या शाही मिरवणुकीत आणि स्नानात कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. तपोवनातून शाही मिरवणूक निघाल्यावर साधू, महंत आणि काही ठरावीक प्रतिनिधींचा अपवादवगळता मिरवणुकीत इतरांचा समावेश राहणार नाही. एवढेच नव्हे तर, मिरवणूक मार्गावर भाविकांनी गर्दी करू नये यासाठी ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले आहेत. शाही मार्ग हा भाविकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याने शाही मिरवणुकीचे सौंदर्य पाहण्याचा आनंद त्यांना घेता येणार नाही. मिरवणूक मार्गावर ज्यांची घरे आहेत, अशांनाही काही ठरावीक अंतरावरूनच मिरवणुकीचे दर्शन घेता येणार आहे. शाही मिरवणूक हे पर्वणीचे एक प्रमुख अंग आहे. बहुतेक भाविक खास ही मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात. मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून हजारो आनंद घेतात.