देवरावची कमाल..! एका हेक्टरमध्ये ४१ क्विंटल हरभरा

त्याच्याकडे कृषी पदविका नाही. तंत्र, यंत्राची धड माहिती नाही.

पीक स्पर्धेत राज्यातून तिसरा क्रमांक

चंद्रपूर : त्याच्याकडे कृषी पदविका नाही. तंत्र, यंत्राची धड माहिती नाही. मात्र त्याने कमाल केली. एका हेक्टरात तब्बल ४१ क्विंटल हरभऱ्याचे पीक घेतले. राज्य पातळीवरील रब्बी हंगाम पीक स्पर्धेत त्याने तिसरा क्रमांक पटकावला. देवराव कोन्दूजी शेडमाके असे शेतकऱ्याचे नाव असून चंद्रपूर जिल्ह्यत येणाऱ्या डोंगरगाव या खेडेगावातील तो रहिवासी आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसत आहे. त्यामुळे शेतीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. अशात गोंडपिपरी तालुक्यातील  डोंगरगावातून कृषी क्षेत्रासाठी आनंदाची बातमी मिळाली. गोंडपिपरी या मागासलेल्या तालुक्यातील डोंगरगावात आदिवासी बांधवांची मोठी वस्ती. शेती आणि मजुरी हा व्यवसाय. देवराव शेडमाके यांच्या वडिलाकडे पाच एकर शेतजमीन आहे. या जमिनीत ज्वारी, सोयाबीन, कापूस, हरभराचे पीक ते घ्यायचे. पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. निसर्गाचा लहरीपणा आणि कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांचा माहितीअभावी शेतीतून फार कमी नफा मिळायचा. देवरावने शेतीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले. त्यासोबतच कृषी विभागाचे मार्गदर्शन घेणे सुरू केले. सिंचनाचा व्यवस्थेत शेतात विहीर खोदली. तुषार सिंचन लावले. शेणखताचा वापर केला. २००७-८ मध्ये एका एकरात ३७ क्विंटल कापूस पिकवला. यावर्षी रब्बी हंगामात देवराव यांनी एक हेक्टरमध्ये हरभरा पेरला. या दरम्यान कृषी सहायक कल्पना चौधरी यांनी कृषी विभागाने सुरू केलेल्या पीकस्पर्धेची माहिती दिली. राज्य पातळीवरील रब्बी हंगाम पीक स्पर्धेतील आदिवासी गटातून देवरावने अर्ज भरला. शेतीकामात देवराव शेडमाके यांना पत्नी शोभा, मुलगा विवेक, मुलगी सुप्रिया यांची मोलाची साथ मिळाली. त्यांनी घेतलेल्या मेहनीतेचे फळ मिळाले. एका हेक्टरात तब्बल ४१ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन झाले. राज्य पातळीवर एका हेक्टरात हरभरा पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेणारा देवराव शेडमाके तिसरा ठरला. पीक स्पर्धेचे तिसरे बक्षीस जाहीर झाला. मुंबई मध्ये होणाऱ्या सोहळ्यात बक्षीस वितरण होणार आहे.

शेती हा माझा आवडता विषय आहे. पिके घेताना नवेनवे प्रयोग मी करीत असतो. कृषी विभागामुळे मला आधुनिक शेती कळली. मला मिळालेल्या यशात माझा परिवार आणि कृषी विभागाची मोलाचा वाटा आहे.

– देवराव शेडमाके, शेतकरी

डोंगरगावातील मडावी नागपूर विभागातून दुसरा रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक घेणारे डोंगरगावातील शेतकरी साईनाथ मडावी यांनी पीक स्पर्धेत नागपूर विभागातून दुसरे स्थान पटकावले. तर जिल्हास्तरांतून डोंगरगावातील तीन शेतकऱ्यांनी बाजी मारली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devrao superb 41 quintal hectare gram ssh

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या