अलिबाग: भाजपचे जिल्हाध्यक्षपद भुषविणाऱ्या धैर्यशील पाटील यांना दुहेरी धक्का बसला आहे. आधी जिल्हा परिषदेत पत्नी निलीमा पाटील यांना धक्कादायक पराभव सामोरे जावे लागले आहे. तर आता पक्षाने राज्यसभेसाठी पक्षाने धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी नाकारली आहे.
नेमके झाले काय ?
शेतकरी कामगार पक्षातून २०२२ मध्ये धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष प्रवेशानंतर त्यांना दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले. आणि लोकसभा निवडणकीची तयारी करण्यास सांगण्यात आले होते. पाटील यांनी त्या दृष्टीने तयारी सुरू कोली होती. पण महायुतीमुळे रायगड मतदारसंघ भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडला. सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यामध्ये नाराजी होती. यावेळी पेण येथे तटकरे यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धैर्यशील पाटील यांनी केलेला त्याग पक्ष विसरणार नाही, त्यांना योग्य वेळी संधी दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यामुळे उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर २०२४ मध्ये धैर्यशील पाटील यांना संधी देण्यात आली होती.
उदयनराजे यांनी चार वर्ष राज्यसभेवर काम केले होते. त्यामुळे धैर्यशील पाटील यांना दोन वर्षाचा कार्यकाळ मिळाला. या कार्यकाळात ते राज्यसभेत आणि पक्षपातळीवर प्रभाव पाडण्यात फारसे यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुन्हा संधी दिली नाही.
उमेदवारी का नाकारली?
धैर्यशील पाटील राज्यसभेवर दोनच वर्षांचा कार्यकाळ मिळाल्याने पुन्हा संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करत होते. मात्र आज भाजपने उमेदवारी जाहीर करतांना पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. पक्षाने राज्यातून राज्यसभा निवडणुकीसाठी चार नावांची घोषणा केली. ज्यात विनोद तावडे, रामदास आठावले, माया ईवनाते, आणि रामराव वडकुते यांना संधी देण्यात आली. त्यामुळे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. धैर्यशील पाटील यांच्यासाठी हा महिन्याभरातील दुसरा मोठा धक्का आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी निलीमा पाटील यांना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
कोकणात भाजपच्या कक्षा रुंदवाव्यात यासाठी २०२४ मध्ये धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती. बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांच्या पश्चात राज्यसभेवर जाणारे ते कोकणातील दुसरे खासदार बनले होते. मात्र दोन वर्षाच्या कार्यकाळात ते राज्यसभेत फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. संसदीय कामकाजात आपली छाप सोडण्यात आलेले अपयश, आणि पक्षश्रेष्ठींची नाराजी त्यामुळे पक्षाने पुन्हा संधी देतांना त्यांचा विचार केला नसल्याची चर्चा आहे.
धैर्यशील पाटील यांची राजकीय कारकीर्द कशी?
धैर्यशील पाटील यांना राजकारणाचे बाळकडून आपले वडील मोहन पाटील यांच्याकडून मिळाले. मोहन पाटील हे शेकापचे जेष्ठ नेते होते. त्यांनी राज्यमंत्री पदावर काम केले होते. त्यामुळे लहान पणापासून धैर्यशील पाटील यांच्यावर डाव्या विचारांचा प्रचंड पगडा होता. ओघवती वक्तृत्वशैली, खणखणीत आवाज अभ्यासपूर्ण भाषणे यामुळे उत्तम वक्ता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. पक्षसंघटनेत त्यांच्या कामाची दखल घेऊन शेतकरी कामगार पक्षाने सलग तीन वेळा पेण विधानसभेची उमेदवारी दिली. २००९ आणि २०१४ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. मात्र २०१९ मध्ये त्यांच्या भाजपच्या रविद्र पाटील यांनी पराभव केला होता. या पराभवानंतर त्यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर २०२४ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले होते.
भाजपचा निर्णय तटकरेंच्या पथ्यावर?
धैर्यशील पाटील यांना पून्हा संधी न देण्याचा निर्णय खा. सुनील तटकरे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. धैर्यशील पाटील यांची खासदारकी गेल्याने तटकरे यांना आव्हान देऊ शकेल असा जिल्ह्यातील मोठा प्रतिस्पर्धी आपणहूनच दूर झाला आहे. धैर्यशील पाटील यांचे राजकीय आणि प्रशासकीय वजन आपणहूनच कमी होणार आहे. याचा सर्वाधिक राजकीय फायदा खासदार सुनील तटकरे यांना होण्याचा चिन्ह दिसत आहेत.
