रत्नागिरी : एकेकाळी राजेशाही थाट अनुभवलेली वास्तू आज रानवेलींच्या विळख्यात हरवली आहे. ज्या प्रांगणात कधीकाळी राजसत्ता नांदली, त्याच ठिकाणी आज झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील चालुक्यकालीन राजवाड्याचे भग्नावशेष आणि प्राचीन मंदिराचे अवशेष इतिहासाच्या उपेक्षेची जणू साक्ष देत आहेत. गर्भगृहातील भग्नावस्थेतील देखणी मूर्ती, कोसळलेल्या वास्तू आणि दगडांमध्ये दडलेला इतिहास आजही गतवैभवाची कहाणी सांगत आहे. मात्र, एवढा महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा असूनही त्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. इतिहासाचे हे वैभव असेच नष्ट होण्याची वाट पाहायची का, असा सवाल आता धामापूरच्या ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

पूर्वी ‘धर्मपूर’ म्हणून ओळखले जाणारे धामापूर हे गाव प्राचीन कोकणच्या इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. संगमेश्वर परिसराला चालुक्य आणि शिलाहार राजवटींचा समृद्ध वारसा लाभला आहे. सातव्या शतकात करवीरच्या चालुक्य राजा कर्णाने संगमेश्वर येथे प्रसिद्ध कर्णेश्वर मंदिर उभारल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे. याच राजवटीच्या काळातील राजवैभवाचे धागेदोरे धामापूरमधील अवशेषांतून समोर येत असल्याचे दिसते.

भग्न मंदिरात शिल्पकलेचा जिवंत पुरावा!

धामापूर ग्रामपंचायत हद्दीतील ओढ्याच्या काठावर चिऱ्यांच्या बांधकामातील प्राचीन मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. मंदिराचे बाह्य बांधकाम काळाच्या ओघात कोसळले; मात्र गर्भगृहाने अद्याप आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. गर्भगृहातील मूर्तीचे दोन्ही पाय गुडघ्याखालून भग्न झाले असले, तरी शिरावरील उंच जटामुकूट, कंबरपट्टा आणि वस्त्रांवरील नक्षीकाम तिच्या कलात्मक सौंदर्याची साक्ष देते. मूर्तीमागील कमानदार चौकट आणि शिल्पाची ठेवण शिलाहारकालीन कलेशी साधर्म्य दर्शवते. ही मूर्ती साधारण ११व्या ते १३व्या शतकातील असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

राजवाडा भग्न, पण शिमग्याचा मान कायम!

स्थानिक रहिवासी दत्ताराम तानू भायजे यांच्या माहितीनुसार, ‘गिमोस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात पूर्वी चालुक्य राजाचे वास्तव्य असावे. राजेशाहीचा काळ इतिहासजमा झाला; मात्र त्या राजवाड्याशी जोडलेली ग्रामसंस्कृती आजही जिवंत आहे. शिमगोत्सवात वाघजाई आणि जाखमाता देवीच्या पालख्या या राजवाड्याच्या प्रांगणात मानासाठी आणल्या जातात.जाखमाता ही पूर्वापार राजघराण्याची देवता मानली जाते. राजवाड्याच्या भिंती ढासळल्या, राजसत्ता संपली; पण ग्रामस्थांनी श्रद्धेचा हा ऐतिहासिक वारसा आजही जपला आहे.

इतिहासाचे अवशेष की प्रशासनाच्या उदासीनतेचा नमुना?

धामापूरमधील राजवाडा आणि मंदिराचे अवशेष हा केवळ गावाचा नव्हे, तर संपूर्ण कोकणचा ऐतिहासिक ठेवा आहे. मात्र, रानवेलींच्या विळख्यात अडकलेल्या या वास्तूंची अवस्था पाहता संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुरातत्त्व विभागाने अद्याप या ठेव्याचे शास्त्रीय पद्धतीने संशोधन, सर्वेक्षण आणि उत्खनन करून त्याचा इतिहास उजेडात आणण्याची गरज आहे. योग्य वेळी संवर्धन झाले नाही, तर पुढील पिढ्यांना हा इतिहास केवळ भग्न दगडांच्या रूपातच पाहावा लागेल. राजवाड्याचे अवशेष नष्ट झाल्यानंतर जाग येण्यापेक्षा ते शिल्लक असतानाच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे.

कोकणात असे अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. इतिहास सांगणा-या या वास्तू जपण्याची गरज आहे. यासाठी शासन स्तरावरुन योग्यती पाऊले उचलणे खुपच गरजेचे आहे. तरच हा ठेवा जतन केला जावू शकेल.- दत्तराज खातू , ग्रामस्थ संगमेश्वर