कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यातील सत्तासंघर्ष पेटला आहे. “आमचं ठरलंय म्हणत लोकसभा निवडणुकीत माझा घात केला, इथून पुढे महाभारत होणार आणि वाईटाचा नाश होणार, असा इशारा धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांना दिला आहे. कोल्हापूरात आयोजित दहीहंडी कार्यक्रमात महाडिकांनी हे वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा- “हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार” भ्रष्टाचाराचे आरोप करत किरीट सोमय्यांचा सूचक इशारा!

महाडिक आणि सतेज पाटलांमध्ये सत्तासंघर्ष

गेल्या २० दशकांपासून महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील सत्तासंघर्ष पहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते विधानसभा आणि गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांनाच यश मिळाले होते. धनंजय महाडिक यांची राजकीय कार्यकीर्द धोक्यात आली होती. महाडिकांच्या साखर कारखाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरही सतेज पाटील यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यामुळे कोल्हापुरचे राजकारण एकतर्फी असल्याचे चित्र वाटत असतानाच मध्यंतरीच राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या विजयामुळे धनंजय महाडिकांचे राजकीय पुनर्वसन होण्यास मदत झाली.

हेही वाचा- “वरळीचा आमदार आमच्याच मताने निवडून आला, शहाणपणा शिकवू नये,” शिवसेनेच्या ‘हायजॅक वरळी’च्या आरोपावर आशिष शेलार आक्रमक

सतेज पाटलांचे महाडिकांना आव्हान

राज्यसभा निवडणुकीतील यशानंतर धनंजय महाडिक व भाजप यांची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढली आहे. त्याचा प्रभाव आगामी काळातील निवडणुकीत दिसेल, असा दावा भाजपा व महाडिक गटाकडून केला जात आहे. यावर “जे काही करायचे ते निवडणुकीच्या रणांगणात करून दाखवू. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे,” असे सांगत भाजपची ताकद नगण्य असल्याचा उल्लेख सतेज पाटलांनी केला होता. त्यावर “आम्ही रणांगण सोडलेले नाही. आणखी ताकतीने येणार आहोत”, असे म्हणत पाटलांच्या आव्हानाला खासदार धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले होते.