विलास घुले हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विलास घुले यांच्या हत्येच्या प्रकरणातील सूत्रधार कोण? याचा शोध घेण्याची मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी विलास घुले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

‘विलास घुले हत्या प्रकरणात पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली आहे, मग एका आरोपीला अटक का केली नाही? तो लाडका आहे का?’, असं म्हणत आमदार धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होण्याची गरज आहे. या घटनेतील ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, आणखी एका आरोपीला अटक केलेलं नाही. तो एक आरोपी पोलिसांचा लाडका आहे का? हे मला ज्या व्यासपीठावर बोलायचं, त्या व्यासपीठावर मी बोलेन.पण ३०२ मध्ये एखाद्या आरोपीला अटक होत नाही, का? तर त्याची वेगळी तपासणी सुरू आहे. त्या एका व्यक्तीला पोलिसांना या प्रकरणातून बाहेर काढायचं आहे का? या घटनेतील जे काही पुरावे आहेत, ते नष्ट करण्यासाठी त्या आरोपीला बाहेर ठेवलं जात आहे का?”, असे सवाल धनंजय मुंडे यांनी केले आहेत.

“विलास घुले हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही मोकाट आहे. त्यामुळे ही भिती आहे की त्या आरोपीने जर या घटनेतील काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर या प्रकरणातून काय बाहेर येईल? आमचा आता पोलिसांवर असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे. त्यामुळे पोलीस त्याला अटक करत नाही. आज आम्ही सर्वांच्या उपस्थितीत सांगतो की त्या आरोपीला पोलिसांनी अटक करावी एवढ्या ताकदीने आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही शांत बसणार नाही. एखाद्या गुन्ह्यात एकाला एक न्याय आणि दुसऱ्या गुन्ह्यात दुसऱ्याला वेगळा न्याय?”, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

“विलास घुले हत्या प्रकरणातील सूत्रधाराबाबत अनेक जणांनी साक्ष दिली, पण पोलीस ती साक्ष मानायला तयार नाहीत. मग नेमकी कुठली साक्ष पोलिसांना पाहिजे? या बाबतीत हे प्रकरण आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलं. या घटनेबाबत मी विधानसभेत देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणातील एक आरोपी, मग तो कोणाचाही असो, मला देणंघेणं नाही. मात्र, न्याय हा सर्वांना सारखाच असला पाहिजे”, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.