बहीण-भावाच्या लढतीत पंकजा यांच्यावर धनंजय मुंडे यांची मात
जिल्हय़ातील राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या अंबाजोगाई बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत भाजप नेत्या, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला पराभवाची धूळ चारून राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पॅनेलने १८पकी १४ जागा जिंकून समितीची सत्ता खेचून घेतली. परळी व केज विधानसभा मतदारसंघांत विखुरलेल्या या बाजार समितीच्या सत्तेसाठी मुंडे बहीण-भावाने प्रतिष्ठा पणाला लावली होती. पालकमंत्री मुंडे यांनी स्थानिक पातळीवर दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मोट बांधल्याने पक्षीय राजकारणाची खिचडी झाली होती. समितीची सत्ता कायम ठेवण्यासाठी दोन दिवस तळ ठोकून भाजपच्या दोन आमदारांना मदानात उतरवल्याने निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते.
अंबाजोगाई बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. भाजपच्या ताब्यातील बाजार समितीची सत्ता कायम ठेवण्यास पालकमंत्री मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथ मुंडे विकास पॅनेलमध्ये भाजपच्या दत्ता पाटील, रमेश आडसकर यांच्यासह काँग्रेसचे राजकिशोर मोदी, राष्ट्रवादीचे राजाभाऊ औताडे यांची मोट बांधून आमदार संगीता ठोंबरे व आर. टी. देशमुख यांना प्रचाराच्या मदानात उतरवले. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अक्षय व नंदकिशोर मुंदडा, काँग्रेसचे संजय दौड, राजेसाहेब देशमुख, विलास सोनवणे यांनी विकास पॅनेलच्या माध्यमातून तगडे आव्हान उभे केले. काँग्रेसच्या प्रा. टी. पी. मुंडे यांनीही शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, शिवसेनेचे प्रमोद आदनाक, काँग्रेसचे अनंत जगतकर, वसंत मोरे यांची मोट बांधून संघर्ष पॅनेल उभे केले.
निवडून आलेल्या संचालक मंडळात राष्ट्रवादीचे मधुकर काचगुंडे, गुलाब गंगणे, गोिवद देशमुख, भरवनाथ देशमुख, इंद्रजित निळे, मुकुंद शिनगारे, सविता वाकडे, जलाल इमाम गवळी, पुरुषोत्तम भन्साळी, राजकुमार गंगणे, सत्यजित सिरसाट, बळवंत बावणे, सत्यवान मोरे, बंडू जोगदंड तर भाजपचे दत्ता पाटील, प्रताप आपेट, सुनील लोमटे व वत्सलाबाई करपे यांचा समावेश आहे. विधानसभेच्या मैदानातील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गावपातळीवरील सर्वसामान्य लोकांशी संपर्क वाढवून संघटन मजबूत करण्यावर भर दिला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजलगावनंतर अंबाजोगाई बाजार समितीत राष्ट्रवादीने बाजी मारली. मात्र, भाजपच्या ताब्यातील स्थानिक संस्थांमध्ये पराभव झाल्याने नेतृत्वाबद्दलची नाराजीही व्यक्त होत असल्याचे मानले जात आहे.