“प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि प्रत्येक सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतो. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय, सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करतात ते सांगा. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं होतं तेव्हा सत्तापरिवर्तन झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं. यावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, ताई स्वतः पण त्याच विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत व त्या त्यांच्या पक्षातील नेत्यांशी विसंगत बोलतात व सल्ले देतात, त्या गोंधळल्या तर नाहीत ना? असा मिश्किल सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला आहे. ऊसतोड कामगार महामंडळासाठी आमच्या सत्ता काळात मला हवं तसं काम करता आलं नाही, आता कामगारांची नोंदणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे. पण सत्ताकाळात काही करता आले नाही, असे म्हणून पंकजाताई मुंडे यांनी आपल्या अपयशाची जाहीर कबुली दिली आहे. त्यावेळी तुमचे तीन-तीन खात्याचे मंत्रीपद कुणाला भाड्याने दिले होते? असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
आम्ही मात्र ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग केल्यापासून सातत्याने राज्यातील ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत व आता त्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे, त्यामुळे आम्ही अ कल्याणकारी आहोत का कल्याणकारी आहोत हे येणाऱ्या काळात जनता ठरवेल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
व्यसनमुक्ती बाबत देखील पंकजा मुंडे यांनी भाष्य केले होते. यावर बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले, “व्यसनमुक्ती हा माझ्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येतो; या सत्कार्यासाठी त्या योगदान देणार असतील तर त्यांचे स्वागत व आभार मानतो.”