scorecardresearch

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ द्या ; धनंजय मुंडेंची विधान परिषदेत मागणी

‘भारतरत्न मिळण्यात क्रांतीसुर्य कमी पडत आहे की आमचे प्रयत्न की पडत आहेत’

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ द्या ; धनंजय मुंडेंची विधान परिषदेत मागणी
(संग्रहित छायाचित्र)

भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांनाही मिळावा अशी मागणी आज(दि.27) विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.

भारतरत्न पुरस्कार प्राप्त माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसेच सामाजिक कार्यकर्ते स्व. नानाजी देशमुख, प्रख्यात संगितकार स्व. भुपेन हजारीका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी ही मागणी केली.

या प्रस्तावावर बोलतांना सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली. त्याचा धागा पकडत मुंडे यांनी फुले दाम्पत्यांना हा पुरस्कार द्यावा अशी मागणी करताना यासाठी आम्ही अनेकवेळा मागणी केली, त्यासाठी सातत्याने भांडत आहोत. परंतू भारतरत्न मिळण्यात क्रांतीसुर्य कमी पडत आहे की आमचे प्रयत्न की पडत आहेत असा प्रश्न उपस्थित केला.

राष्ट्रपती होईपर्यंत काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत असणारे प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर मात्र मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असे कधीही वक्तव्य केलेले नाही. त्यांनी कायम शिष्टाचार पाळला. या देशातील काही राज्यपालांना मात्र याचा विसर पडतो आहे आणि ते उघडपणे मी पक्षाचा एखाद्या संघटनेच्या विचार सरणीचा कार्यकर्ता असल्याचे जाहीररित्या बोलत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. नागपूरमध्ये संघ कार्यक्रमात जाऊन त्यांनी सांगितलेल्या पाच मोलाच्या गोष्टीही त्यांनी वाचून दाखविल्या तसेच त्यांचा गौरव म्हणजे काँग्रेसच्या विचारांचा नरेंद्र मोदी सरकारने केलेला गौरव आहे असा उल्लेख केला.

‘आरएसएस’चे स्वयंसेवक असूनही नानाजी देशमुख हे पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञानवादी विचारांचे होते याकडे धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले तर भूपेन हजारीका हे शब्दांचे सौंदर्य आपल्या गाण्यातून मांडणारे महान व्यक्तीमत्व होते. त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार हा त्यांचा सांगितीक कारकिर्दीचा गौरव असल्याचे उद्गार त्यांनी काढले. या तीनही भारतरत्नांनी केलेले कार्य, दिलेले विचार महान आहेत. त्यांचे विचार त्यांनी सुरु केलेल्या सामाजिक कार्यातून यापुढेही सुरु राहील असा विश्वास मुंडे यांनी बोलताना व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या