Dhananjay Munde Emotional Video : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्य हादरून गेल्याचे पाहायला मिळाले. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवारांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडपणे आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. यादरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच ‘देवगिरी’ या अजित पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी गेलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज (शनिवार) सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचाली पाहायला मिळाल्या. यादरम्यान धनंजय मुंडे यांनी ही पोस्ट केली आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच त्यांनी अजित पवारांबद्दलची एक आठवण देखील सांगितली आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, “२०१२ पासून देवगिरी या स्व. अजितदादांच्या मुंबईतील निवासस्थानी जातो, आज पहिल्यांदाच स्व. अजित दादा नसताना जावे लागले… दादांना कधी कोणी पाया पडलेलं आवडत नसायचं, पण देवगिरीवर तो अधिकार मला होता. दुर्दैव आमचं की आज दादांच्या फोटोला नतमस्तक व्हावं लागत आहे.”
अजित पवार हे २८ जानेवारीच्या सकाळी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने मुंबईहून बारामती येथे जात होते. मात्र बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह इतर चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच या दुर्घटनेचे नेमके कारण काय आहे हे शोधून काढण्यासाठी विविध यंत्रणांकडून याची सखोल चौकशी केली जात आहे.

