सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (१ मे) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथे निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कापूस खरेदी केंद्र वाढवणे, तूर व हरभरा खरेदी केंद्र सुरू करून ग्रेडर नेमणे या प्रश्नावर तोडगा काढण्याची ग्वाही दानवे यांनी दिल्याचे मुंडे यांनी सांगितले. टाळेबंदीत राष्ट्रवादी आणि भाजपा नेत्यांमधील भेटीत केवळ शेतीमाल खरेदी विषयावर चर्चा झाली की आणखी काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण विधानपरिषद निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगानं ही निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढले गेले नाही तर नवलच!

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शुक्रवार सायंकाळी भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भोकरदन (जि. जालना) येथे जाऊन भेट घेतली. दानवे यांच्यावतीनं धनंजय मुंडे यांचा कौटुंबिक सत्कारही करण्यात आला. यावेळी मंत्री मुंडे यांनी जिल्ह्यात कोरोना टाळेबंदीमुळे कापूस खरेदी केंद्रांना मर्यादा लावल्या असून, नोंदणी केलेल्या एका शेतकऱ्याचा ४० क्विंटलच कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत असल्याने खरेदी केंद्राची संख्या वाढण्याची मागणी यावेळी मुंडे यांनी दानवे यांच्याकडे केली.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी सातबारावर नोंद असलेल्या वाढीव कापसाला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रमाणित करून देण्याच्या अटीवर वाढीव कापूस खरेदी करण्यास आता अनुमती दिली. कापूस खरेदीबाबत सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ. तसेच एफसीआयमार्फत जिल्ह्यात सुरू झालेली तूर व हरभरा खरेदी विनाव्यत्यय सुरू राहील अशी ग्वाही दानवे यांनी दिल्याचे मुंडे यांनी सांगितले. यावेळी अमरसिंह पंडित, आमदार संतोष दानवे उपस्थित होते.

करोनाच्या टाळेबंदीत राष्ट्रवादी आणि भाजपाच्या प्रमुख दोन नेत्यांमध्यील भेटीत केवळ शेतीमाल खरेदी बाबतच्या अडचणींवर चर्चा झाली. मात्र, विधानपरिषद निवडणुका जाहीर झाल्यामुळे शेतीमाल खरेदी विषयावरील भेटीचेही राजकीय अर्थ काढले गेले नाही तर नवलच!

रावसाहेब दानवे भाजपातील प्रमुख नेते आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघात पंकजा मुंडे यांचा धनंजय यांनी दारुन पराभव केला. त्यानंतर पंकजा यांनी गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन पक्षांतर्गत नाराजी जाहिरपणे व्यक्त केली होती. पंकजा यांना विधानपरिषदेवर घ्यावे अशी समर्थकांची मागणी आहे, या पार्श्वभूमीवर मुंडे दानवे भेटीकडेही पाहिले जात आहे.