धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढलेल्या रिट आणि जनहित याचिकांमधील आहेत. उच्च न्यायालयाचे निष्कर्ष लोकायुक्तांवर बंधनकारक आहेत. त्यामुळे तात्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे प्रकरण पुन्हा उघडता येणार नाही, असे स्पष्ट करत राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारी निकालात काढल्या. यानंतर हे आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जात आहे. तसेच त्यांना संदेश पाठवून हिणवले जात आहे. यानंतर आता स्वत: धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ‘आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये’, असे आवाहन केले आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंजे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे. मुंडे यांनी अंजली दमानिया यांचे नाव न घेता टीका देखील केली आहे. “प्रत्येकाला आपल्या उद्दिष्ट आणि हेतूप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या परीने न्याय-दाद मागण्याच्या प्रक्रियेतून जात आहोत. अश्या परिस्थितीत आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये. हा षडयंत्रांचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अश्या भावनिक व अविचारी कृतीमुळे आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळते, हे लक्षात घ्या. शेवटी संयम सर्वात महत्त्वाचा!” असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

लोकायुक्तांनी दिलेल्या धनंजय मुंडेंवरील कृषी खरेदी घोटाळा आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट संबंधी आरोपांबाबत निर्णयाची प्रत सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. तसेच मुंडे यांना क्लीन चीट, असे वृत्त दूरचित्रवाहिन्यांनी दिले गेले. त्यानंतर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून दमानिया यांना ट्रोल करण्यात आले. दमानिया यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली तसेच शिवीगाळ करण्यात आली.

लोकायुक्तांनी काय म्हटले आहे.

लोकायुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आपल्या निकालपत्रात उद्धृत केला. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मुद्द्यांवर पुन्हा तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ही तक्रार चालू शकत नाही. हे सर्व मुद्दे यापूर्वीच उच्च न्यायालयासमोर दाखल रिट याचिका व जनहित याचिकांमध्ये मांडण्यात आले होते. उच्च न्यायालयाने दिलेला आदेश लोकायुक्तांवर बंधनकारक आहेत आणि लोकायुक्त मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अपील म्हणून बसू शकत नाहीत, असे लोकायुक्तांनी निकालपत्रात म्हटले आहे.

अंजली दमानिया यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत लोकायुक्तांचा निर्णयात नेमकं काय म्हटलं आहे हे स्पष्ट केले होते. ही बाब सार्वजनिक हिताची असून, संबंधित सर्व कागदपत्रे व पुरावे याबाबत पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील लढा कायम राहील, अशी भूमिका देखील दमानिया यांनी व्यक्त केली होती.