Dhananjay Munde vs Anjali Damania : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे हे सध्या परळीसह बीडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान त्यांनी भुवया उंचावणारी वक्तव्ये केली आहेत. परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बरकतनगर भागात झालेल्या प्रचारसभेत ते म्हणाले, “ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. काहीजण माझं राजकारणच नव्हे तर मला संपवायच्या मागे लागले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही माझ्याबरोबर राहाल की माझी साथ सोडणार?
याच प्रचारसभेत धनंजय मुंडे म्हणाले, “काही लोकांनी परळीला बदनाम केले त्या लोकांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक आहे.” माजी मंत्री म्हणाले, “परळीकरांसमोर अडचणी निर्माण झाल्यानंतर ते देवाच्या आधी माझ्याकडे येतात.” तत्पूर्वी, आणखी एका प्रचारसभेत धनंजय मुंडे अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी व त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या आठवणीने भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
वाल्मिक कराड व धनंजय मुंडे एकच आहेत : मनोज जरांगे पाटील
दरम्यान, यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराडबाबतचं वक्तव्य ऐकून मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले, “धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण येतेय, कराडबाबतचं त्यांचं वक्तव्य ऐकून स्पष्ट होतंय की वाल्मिक व धनंजय मुंडे दोघेही एकच आहेत.”
दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “मंत्रिपद गमावल्यापासून धनंजय मुंडे यांनी त्यांचं मानसिक संतुलन गमावलं आहे.”
मंत्रिपद गेल्यापासून धनंजय मुंडेंचं मानसिस संतुलन बिघडलं आहे : अंजली दमानिया
अंजली दमानिया म्हणाल्या, “मला वाटतंय की धनंजय मुंडे यांचं मानसिक संतुलन कुठेतरी बिघडलं आहे. धनंजय मुंडे यांनी सभेत त्यांच्या मित्राचे म्हणजेच वाल्मिक कराडचे फोटो पाहिले आणि म्हणाले, ‘आज मला माझ्या मित्राची उणीव भासतेय’. त्यानंतर त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं. ते म्हणाले, ‘परळीकर अडचणीत आल्यानंतर देवाच्या आधी ते माझ्याकडे येतात’. त्यांची ही सगळी वक्तव्ये अतिशय विचित्र आहेत. मला वाटतंय की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांची वक्तव्ये पाहून तसंच वाटतंय.”
